तोरणा किल्ल्यावर 50 फूट दरीत कोसळला पर्यटक, 7 तासांच्या थरारक रेस्क्यूनंतर सुखरूप सुटका!
पुण्यातील तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेला २० वर्षीय पर्यटक पाय घसरून सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या तरुणाला आता सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

हिवाळ्यात अनेक पर्यटक ट्रेकिंग करायला जातात. गुलाबी थंडीत ट्रेक करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. पण अनेकदा काळजी न घेतल्याने ट्रेकिंगच्या वेळी अपघात घडतात. असाच एक अपघात पुण्यात घडला आहे. पुण्यातील तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेला २० वर्षीय पर्यटक पाय घसरून सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. यानंतर तातडीने त्याला वाचवण्यासाठी थरारक रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. सुमारे सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात यश आले. मध्यरात्री दीड वाजता हे संपूर्ण थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले. सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी तरुणाचा जीव वाचला. कैलास विलास गावडे वय २० वर्षे अशी या तरुणाची ओळख पटली आहे. याचे मूळ गाव मुळशी असे आहे. या तरुणाचा या अपघातात पाय फॅक्चर झाला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार कैलास गावडे हा युवक सोमवारी ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर आला होता. बुधला माची परिसरात फिरत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला. यानंतर त्याला मदतीसाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
सुमारे सात तास चालले रेस्क्यू ऑपरेशन!
अपघाताची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस हवालदार आकाश पाटील यांनी तत्काळ सह्याद्री रेस्क्यू आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन मदत पथकाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर या आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम आणि सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम, भोर येथील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेले हे थरारक बचावकार्य रात्री एक वाजेपर्यंत सुरू होते. दरीतून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर युवकाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या बचाव मोहिमेत दोन्ही रेस्क्यू पथकांच्या एकूण १७ सदस्यांनी सहभाग घेतला. दुर्गम भागात राबविलेल्या या संयुक्त बचाव मोहिमेमुळे जखमी पर्यटकाला वेळेत बाहेर काढणे शक्य झाले.
तोरणागडाची अवघड आणि खडकाळ चढ-उताराची वाट अशा कठीण परिस्थितीत जखमी तरुणाला कोणतीही अधिक दुखापत होऊ न देता खाली आणण्यासाठी टीममधील प्रत्येक सदस्याने प्रचंड मेहनत घेतली. अखेर सुमारे सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाला सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणण्यात आले आणि त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.