संजय राऊत यांना धमकी देणारा बिश्नोई गँगशी संबंधित? मुंबई पोलिसांनी दिली मोठी माहिती

| Updated on: Apr 01, 2023 | 4:36 PM

एकनाथ शिंदे यांचे चाळीस आमदार यांच्या मागेपुढे दोन-दोन गाड्या असतात. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे, असा आरोप संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत धमकी प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

संजय राऊत यांना धमकी देणारा बिश्नोई गँगशी संबंधित? मुंबई पोलिसांनी दिली मोठी माहिती
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी देणारा संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. काल रात्रीच पुण्यातून सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची प्राथमिक चौकशीदेखील करण्यात आली आहे. धमकीच्या संदेशात या तरुणाने लॉरेन्स बिश्नोई या कुख्यात गँगस्टरचं नाव घेतलं होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांचे धाबे दणाणले होते. पंजाबमधील गँगस्टरकडून संजय राऊत यांना का धमकी येण्यामागचं नेमकं कनेक्शन काय आहे, अशी चर्चा सुरु झाली. मात्र पोलिसांच्या चौकशीतून वेगळीच माहिती समोर आली आहे. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी माध्यमांसमोर यासंबंधी माहिती दिली.

कोण आहे राहुल तळेकर?

संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी काल सदर प्रकरणात कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या नंतर पोलिसांचा तपास सुरु झाला. ज्या नंबरवरून धमकीचा संदेश आला, त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं. पुण्यातील राहुल तळेकर या तरुणाला पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातून त्याला मुंबईतदेखील आणलं गेलंय. राहुल तळेकर हा मूळचा जालना येथील रहिवासी असून पुण्यात तो हॉटेल चालवतो, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

बिश्नोई गँगशी काय संबंध?

संजय राऊत यांना पाठवलेल्या संदेशात लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेण्यात आलंय. हा पंजाबमधील कुख्यात गुंड असून गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात लॉरेन्सचा हात असल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार जेलमध्ये आहे. मात्र पुण्यातील राहुलने दहा दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईवरचा एक व्हिडिओ पाहिला होता. काल त्याने संजय राऊत यांना कॉल केला होता. पण काही कारणास्तव हा संवाद होऊ शकला नाही. त्यानंतर दारूच्या नशेत हा मेसेज केला, अशी प्राथमिक माहिती राहुल तळेकर याने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे सध्या तरी लॉरेन्स बिश्नोई गँगचा आणि संजय राऊत धमकी प्रकरणात पकडलेल्या संशयिताचा काहीही संबंध नसल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

धमकी प्रकरणावरून राजकारण पेटलं

संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीवरून चांगलंच राजकारण पेटलं आहे. एकनाथ शिंदे यांचे चाळीस आमदार यांच्या मागेपुढे दोन-दोन गाड्या असतात. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे, असा आरोप संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी केला आहे.