चिकन शोरमा खाल्यामुळे 56 जणांना विषबाधा, भिवंडीमध्ये मोठी खळबळ
भिवंडीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडी शहरात चिकन शोरमा खाल्यामुळे 15 जून दरम्यान तब्बल 107 जणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

भिवंडीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडी शहरात चिकन शोरमा खाल्यामुळे 15 जून दरम्यान तब्बल 107 जणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एक हादरवणारी घटना समोर आली आहे. चिकन शोरमा खाल्यामुळे आता 56 जणांना विषबाधा झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी वंजारी नाका परिसरात असलेल्या एका शॉपवरून या सर्वांनी चिकन शोरमा खरेदी केला होता.
दरम्यान चिकन शोरमा खाल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर विषबाधेचा परिणाम जाणवू लागला. सुरवातीला एकाच कुटुंबातील चार जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर हळुहळु ही संख्या वाढत गेली. मंगळवारी रात्री 34 जण त्रास जाणवत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. तर बुधवारी सकाळी ही संख्या 56 वर पोहोचली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार उपाचारानंतर आता सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना उलटी, जुलाब, तापचा त्रास जाणवत आहे. अजूनही या रुग्णांवर उपचार सुरूच असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
दरम्यान शहरात जिथे-जिथे उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होते, त्या -त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. ज्यामध्ये 107 जणांना विषबाधा झाली होती. नागरिकांनी सुद्धा उघड्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नयेत, घरातील सकस अन्न खावे. विशेष म्हणजे एक वर्षांच्या आतील मुलांना आणि गरोदर महिलांना देखील विषबाधा झाली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, अस्वच्छ अन्नपदार्थ खाऊ नयेत, असं आवाहान यावेळी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ.माधवी पंदारे यांनी केले आहे.
दरम्यान विषबाधेची ही भिवंडीमधील दुसरी घटना आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता यावर महापालिका काय कारवाई करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.