नदी पलिकडे रुग्णवाहिका थांबली होती, गावकऱ्यांनी आजारी महिलेला डोलीतून नदीपार नेले

आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली आहेत. तरी वैद्यकीय सुविधा आणि रस्ते वाहतूकीचा प्रश्न आवासून उभा आहे. काही गाव खेड्यात 108 एम्ब्युलन्स पोहचू शकत नाही.

नदी पलिकडे रुग्णवाहिका थांबली होती, गावकऱ्यांनी आजारी महिलेला डोलीतून नदीपार नेले
Khanapur - Amgaon
| Updated on: Jul 20, 2024 | 6:05 PM

 

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच झाला. तरीही अनेक गावात सरकार पोहचलेले नाही. याची उदाहरणे नेहमी घडत आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालिक्यातील आमगांव येथील एका महिलेची अचानक तब्येत बिघडल्याने तिला उपचारासाठी डोलीतून नदीपार नेण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा श्वास अडखळल्याने तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन येण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला.परंतू दुर्गम भाग असल्याने गावात पावसाळ्यातील काही महिने उर्वरित जगाशी तुटतो. त्यामुळे गावकरी हतबल झाले आहेत.

खानापूर तालुका हा अरण्याने आणि खनिज संपत्तीने नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो. खानापूर तालुका हा अरण्याने व्यापला असल्याने या दुर्गम भागातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. खानापूर तालुक्यातील अनेक गावे शासनाच्या सोयी आणि सुविधांपासून अद्यापही वंचित आहेत.स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाचा काळ लोटला तरी उपचारासाठी महिलेला डोलीतून चार किलोमीटरपर्यंत न्यावे लागत आहे. खानापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग ओळखला जाणारा आणि चेरापुंजीनंतर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले आमगांव दुर्गम आहे. या ठिकाणी कोणतीच वाहतूक सुविधा नाही. मात्र येथील लोक आपले जीवन निसर्गाशी जुळवून घेऊन कसेतरी जगत आहेत.

जगाशी संपर्क तुटतो

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या गावचा संपर्क उर्वरीत जगाशी तुटलेला आहे. दरवर्षी हीच परिस्थिती असते. गणपतीनंतरच या गावचा संपर्क तालुक्यासह इतर गावाशी होतो. या गावातील लोक गणपतीपर्यंतचा बाजार एकाच वेळी भरून ठेवतात. शिक्षकही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदाच या ठिकाणी येतात. याच गावातील दोन अतिथी शिक्षकांवर येथील शाळा चालते. एक कन्नड शिक्षक बाहेर गावातील आहे.

आमगांव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) यांना दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर आल्यासारखे वाटू लागल्याने गावातील नागरिकांनी त्यांना प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा श्वास अडकल्याने गुदमरु लागले. उपचारासाठी खानापूरला घेऊन येण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला. मात्र त्यांना घेऊन जाण्यासाठी रस्ता आणि वाहन नसल्याने ते हतबल झाले होते. अखेर आमगाव शाळेचा कन्नड शिक्षक बाळेकुंद्री यांनी 108 या रुग्णवाहिकेला संपर्क साधून नदीच्या पलीकडे येण्यास सांगितले. यानंतर हर्षदा घाडी यांना डोलीवरून गावातील 20 ते 25 ग्रामस्थांनी आळीपाळीने त्यांना नदीच्या काठापर्यंत आणले.रुग्णवाहिका नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली होती. या महिलेला लोकांनी डोलीवरून नदीच्या पलीकडच्या काठापर्यंत आणले. यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेला खानापूर इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.