
जळगाव : वैद्यकशास्त्रात नवनव्या आणि काही वेळेस अतिशय दुर्मिळ अशा घटना घडत असतात. अशीच एक वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. आतापर्यंत आपण 21 किंवा 22 बोटx असलेलं बाळ जन्माला आल्याचं ऐकलं असेल. परंतु जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात तब्बल 26 बोटे असलेल्या बाळाचा (26 fingers) जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे. ही वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
मध्य प्रदेशातील झिरन्या येथील रहिवासी असलेल्या ज्योती बारेला या 20 वर्षीय महिलेला शनिवारी मध्यरात्री न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने गरोदर मातेची वैद्यकीय तपासणी केली व परिश्रम घेऊन ज्योती बारेला हिची पहाटे यशस्वी प्रसूती केली.
जन्माला आलेल्या या बाळाला पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले कारण या बाळाच्या हातापायाला तब्बल 26 बोटे होती. सामान्यतः आपल्या हातापायाची मिळून 20 बोटे असतात मात्र या नवजात बाळाला मात्र चक्क 26 बोटे आहेत.
या नवजात बालकाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी सहा बोटे व दोन्ही पायाला प्रत्येकी सात बोटे असल्याने सर्वच अचंबित झाले. या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. सद्यस्थितीत माता व बालक या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे.