
गतीमान विकासाचा मार्ग म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जातो. हा महामार्ग झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर ही दोन शहरं जोडली गेली असून यामधील अंतर हे आठ तासांवर आलं आहे. याच समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना झाली. पण सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. समृद्धी महामार्गावर एक टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली. ही टेम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक झाली. मुंबईहुन यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली.
शॉर्टसर्किटमुळे टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याचा अंदाज आहे. 20 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. अचानक आग लागल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले. इंजिनमध्ये आग लागल्याचे समजताच चालक प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन गेला. सर्व 20 प्रवाशांना खाली उतरल्याने सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही.
सात मिनिटात दोन अपघात
विदर्भातील वाशिमच्या रिसोड शहाराजवळ रिसोड ते सेनगाव मार्गावर रात्री सात मिनिटांच्या अंतरात एकाच ठिकाणी दोन अपघात झाले. यामध्ये 12 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये सात महिलांचाही समावेश असल्याची माहिती मिळतेय. रिसोड-सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ रात्री 10:30 वाजताच्या सुमारास हे अपघात झाले.
साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून येत होते
पहिला अपघात रिसोड वरून हिंगोलीच्या दिशेनं जात असलेल्या एक कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला नाल्यात पडल्याने झाला, तर सात मिनिटानंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून रिसोड कडे येत असलेली क्रुझर गाडी मातिच्या ढिगाऱ्यावर चढली. यामध्ये यामध्ये 9 जण जखमी झालेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.