कोल्हापूरकरांचा नादच खुळा ! जावयासाठी दीड किलो चांदीच्या चपला ! अधिक मासाची भन्नाट भेट; किंमत तर..

कोल्हापूरच्या एका सासर्‍याने अधिक मासात परदेशातील जावयाला खास भेट दिली आहे. दीड किलो वजनाची, सुमारे साडेचार लाख रुपये किमतीची चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून देण्यात आली. कारागीर विक्रांत माळी यांनी आठ दिवसांत ही चप्पल तयार केली. परदेशातही कोल्हापूरची आठवण राहावी, हा यामागे उद्देश आहे. इतर हौशी सासर्‍यांनीही अशा चांदीच्या वस्तू बनवून घेतल्या आहेत.

कोल्हापूरकरांचा नादच खुळा ! जावयासाठी दीड किलो चांदीच्या चपला ! अधिक मासाची भन्नाट भेट; किंमत तर..
चांदीच्या चपला..
| Updated on: May 18, 2026 | 2:47 PM

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती, आणि सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले दर या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलं. भविष्यातील संकट ओळखून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काही महत्त्वाचे आवाहन केलं. परदेश प्रवास टाळा, सोनं-चांदी खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल वाचवा, असं मोदी म्हणाले होते. देशात परकीय चलन सुरक्षित रहावं यासाठी त्यांनी सोनं-चांदी खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे सोन-चांदीच्या व्यापारावंर मंदीचं संकट घोंगावेल असं वाटत होतं, मात्र कोल्हापूरात याच्या अगदी विपरीत घडलं असून ही भीती अनाठायी ठरली आहे.

हिंदू धर्मातील महत्वाचा महिना असलेला अधिक मास कालपासून सुरू झाला असून त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातून एक वेगळीच, पण महत्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील एका सासर्‍याने परदेशात असलेल्या आपल्या जावयासाठी चक्क चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतल्याचे उघड झाले आहे.

कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही

“कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही ” असं म्हणतात, ते काही उगाच नाही. अधिक महिना कालपासून सुरू झाला असून या अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीचे दागिने देण्याची प्रथा आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एक इसमाने त्याच्या जावयासाठी साधीसुधी नव्हे तर चक्क चांदीची चप्पल बनवून घेतली आणि तीही तब्बल दीड किलो चांदीची. या चपलेची किंमतही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल साडेचार लाख रुपये एवढी किंमत आहे. या अनोख्या चपलेची फक्त कोल्हापूरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.

अशी बनवली चांदीची चप्पल

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कारागीर विक्रांत माळी यांनी ही कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. विक्रांत यांनी सुरुवातीला लेदरची कोल्हापुरी चप्पल विकत घेतली. त्यामध्ये ज्या पद्धतीने पार्ट्स आहेत तसेच पार्ट त्यांनी चांदीमध्ये बनवले. साधारण आठ दिवस यावर काम करून तयार झालेली ही चांदीची चप्पल संबंधित इसमाकडे सुपूर्त करण्यात आली. या व्यक्तीचा जावई हा परदेशामध्ये असतो. मात्र तो तिथे असतानाही त्याला कोल्हापूरची आठवण रहावी, यासाठी आपण जावयासाठी खास चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतल्याची माहिती समोर आली. एवढंच नव्हे तर अशाच आणखी काही हौशी सासर्‍यांनी, आपल्या जावयांसाठी काही चांदीचे दागिने आणि वस्तू विक्रांत माळी यांच्याकडून बनवून घेतले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us