
प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाही खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. स्मृतीने संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छलशी भर मांडवात लग्न मोडले. त्यानंतर सर्वांना धक्का बसला. स्मृतीच्या वडिलांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी स्मृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडल्याची माहिती दिली. आता पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. थेट सांगली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संगीतकार पलाश मुच्छलच्या विरोधात सांगली पोलीस अधीक्षकाच्याकडे आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने या तरुणाने पलाश विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय?
पलाश मुच्छलच्या विरोधात सांगली मधील स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने या तरुणाने आर्थिक फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक याच्याकडे केली आहे. सांगलीमधील विज्ञान माने या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिंगचं काम करणाऱ्या तरुणाने संगीतकार पलाश मुच्छल विरोधात एकूण 40 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. ‘नजरिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आपण करणार असुन सदर चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणुन त्यामध्ये गुंतवणुक करावी असे सुरुवातीला सांगितले होते. तसेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यातुन 25 लाख गुंतवणूकीवर 12 लाख रुपयापर्यंत मोबदला मिळणार असल्याचे पलाश याने विज्ञान माने यांना सांगितले होते.
पोलिसाच तक्रार दाखल
दरम्यान, तो या चित्रपटामध्ये अॅक्टिंगचे काम देखील देणार होता असे विज्ञान माने यांने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पलाशने विश्वासात घेऊन माझ्याकडून वेळोवेळी एकूण 40 लाख रुपये घेऊन माझा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केला असल्याचा आरोप विज्ञान माने यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. आर्थिक फसवणूक केल्याबाबत पलाश मुच्छल यांच्यावर आयपीसी 406, 420 प्रमाणे विज्ञान माने यांने पोलिस अधिक्षकांच्या कडे तक्रार दिली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षकांची संपर्क साधला असता त्यांनी फक्त तक्रार दिली आहे गुन्हा दाखल नाही असेही सांगितला आहे.