मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, रात्रंदिवस झोपलं तरी चालतं: सदाभाऊ खोत

| Updated on: Feb 13, 2021 | 10:36 PM

राजकारणात लोक जेवढं मिळतं तेवढं घेतात. अडीच वर्षाच्या पदाचं काही खरं नसतं. अनेक लोकांना शब्द दिला जातो, तुला आमदार करतो. | Sadabhau Khot

मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, रात्रंदिवस झोपलं तरी चालतं: सदाभाऊ खोत
राजकारणात तुम्ही झोपून राहिलात तर लोक गळा दाबून जातात, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याबद्दल सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.
Follow us on

सांगली: तुम्ही एकदा मंत्री झालात की रात्रंदिवस झोपून राहिले तरी चालते, असे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केले. मी मंत्री होईन, असे कोणाला वाटले तरी होते का? पण मंत्री झाल्यावर मला कळाले की, त्यासाठी काही अक्कल लागत नाही. मंत्री झाल्यावर रात्रंदिवस झोपले तरी चालते, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. (After you become minister you can sleep whole day says Sadabhau Khot)

ते शनिवारी सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी तुफान फटकेबाजी केली. राजकारणात लोक जेवढं मिळतं तेवढं घेतात. अडीच वर्षाच्या पदाचं काही खरं नसतं. अनेक लोकांना शब्द दिला जातो, तुला आमदार करतो. राजकारणात तुम्ही झोपून राहिलात तर लोक गळा दाबून जातात, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याबद्दल सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.

… तर माझी पत्नी म्हणाली असती मला खासदार करा: सदाभाऊ खोत

या कार्यक्रमाला कवठेपिरानचे भीमराव माने उपस्थित होते. त्यांच्या पत्नीला सरपंचपद मिळाल्याचा धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी मिश्किल टिप्पणी केली. भीमराव माने यांनी त्यांच्या पत्नीला सरपंच केले. या कार्यक्रमाला माझी पत्नी आली असती तर ती हे बघून, तुम्ही आमदार झालात, मला खासदार करा, असं म्हणाली असती, असे खोत यांनी म्हटले.

पडळकर बारका गडी, पण राज्यभरात चर्चा

गोपीचंद पडळकर हा बारका गडी आहे, पण राज्यभरात त्यांची चर्चा सुरु आहे. पडळकर फक्त टीव्हीवर आले की लोक बघतात. आता पडळकर कोणाला काय बोलणार, याची लोकांना उत्सुकता असते, अशी टिप्पणी सदाभाऊ खोत यांनी केली.

‘अहिल्यादेवी होळकरांविषयी इतका आदर वाटतो तर शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही?’

अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी शरद पवार (Sharad Pawar) यांना इतकेच प्रेम आहे तर आजपर्यंत त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील (ST Reservation) आरक्षण का मिळवून दिले नाही, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. तुम्ही 50 वर्षे सरकारमध्ये होता, मग ही गोष्ट का जमली नाही. आतादेखील तुम्ही राज्यात सत्तेत आहात. मग धनगर समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण देणे तुम्हाला का जमत नाही, अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली. (Sadabhau khot slams Sharad Pawar in Sangli)

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी तळागाळातील लोकांसाठी काम केले. जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला? हा मुद्दा केवळ पुतळ्याचा उद्घाटनाचा नाही. धनगर समाजाला फसवले गेल्यामुळे तो संतप्त झाला आहे. हीच फसवणारी माणसं आमच्या दैवताचं गुणगान गाणार असतील तर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे वेडे पीर दोन हात करायला उभे राहतील, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

(After you become minister you can sleep whole day says Sadabhau Khot)