फक्त गुजराती, मारवाड्यांनीच अर्ज करा, नोकरीच्या जाहिरातीवरून प्रचंड संताप, मराठी माणसाला…
नोकरी डॉट कॉमवर काल एक जाहिरात प्रसिद्ध झाली. अहमदाबाद बेस्ड केमिकल कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी 22 लाखांच्या पॅकेजची ही जाहिरात होती. मात्र, या जाहिरातीत फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांसाठी असल्याचे नमूद करण्यात आले होते.

Gajanan Kirtikar : नोकरी डॉट कॉमवरील एका जाहिरातीवरून वाद पेटला आहे. अहमदाबादच्या कंपनीने जनरल मॅनेजर पदासाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना पसंती दिल्याने शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठी उमेदवारांची निवड न केल्यास कंपनीचे कामकाज बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
22 लाखांच्या पॅकेजसाठी जाहिरात
नोकरी डॉट कॉमवर काल एक जाहिरात प्रसिद्ध झाली. अहमदाबाद बेस्ड केमिकल कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी 22 लाखांच्या पॅकेजची ही जाहिरात होती. मात्र, या जाहिरातीत फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांसाठी असल्याचे नमूद करण्यात आले होते. यावर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबईत येऊन धंदा करायचा आणि मराठी माणसाला नोकरीपासून वंचित ठेवायचे, हे सहन केले जाणार नाही, असे ते म्हणाले.
आम्ही घेराव घालून कंपनीच्या कामकाज बंद पाडू
“वाह रे वाह! मुंबईत येऊन धंदा करायच्या आणि मुंबई मधला जो मराठी माणूस नोकरीच्या शोधात आहे त्याला नोकरी पासून वंचित करायच्या. कंपनी ब्रांच कुठे उघडणार हे मला कळलेलं नाही. पण कुठल्याही परिस्थितीत मराठी उमेदवारांची निवड केली नाही तर त्या कंपनीवरती आम्ही घेराव घालून कंपनीच्या कामकाज बंद पाडू. आम्ही हे सहन करणार नाही आणि आम्ही सोडणार नाही,” असा इशाराच गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे.
कंपनी नेमका काय निर्णय घेणार?
गजानन कीर्तिकर यांनी या प्रकाराला ‘मराठी माणसावर अन्याय’ असे संबोधले आहे. मुंबईत येणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून वारंवार केली जाते. आता या जाहिरातीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नोकरी डॉट कॉमवरील या जाहिरातीवरून राजकीय वातावरण तापले आहे. कंपनी यावर काय स्पष्टीकरण देते आणि गजानन कीर्तिकर यांच्या इशाऱ्यानंतर काय भूमिका घेते, मराठी माणसाला नोकरीवर घेतले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.