मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ?, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारस्कर आक्रमक..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यासोबत उपोषणात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेले लोक त्यांच्याविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत. त्यातच आता त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याच्या पहिल्या दिवसापासूनसोबत असलेल्या ललिता तारख यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले. यासोबतच सर्वांच्या संपत्तीची चाैकशी करण्याचीही मागणी केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या ललिता तारख यांनीहीच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अजय महाराज बारस्कर अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. हेच नाही तर गंभीर आरोप करत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अजय महाराज बारस्कर यांनी थेट पुराव्याचा पेनड्राइव्ह पोलिसांकडे सुपूर्द केला. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अजय बारस्करांनी काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. तीच तक्रार वर्ग झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी अजय महाराज बारस्कर आज जालन्यातील अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टच्या उपोषणा दरम्यान महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात अश्लील शब्द वापरल्याचा आणि महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. याशिवाय मराठा समाजातील तरुणांना फाशी घेण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बारस्कर यांनी पोलिसांकडे केली आहे.
तसंच आपल्या तक्रारीच्या समर्थनार्थ पुराव्यांचा पेनड्राइव्हही त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. आता या तक्रारीवर अंबड पोलिस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजय महाराज बारस्कर हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. त्यातच आता त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे . पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होतो का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.