अजितदादांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं? ‘तो’ Video समोर

एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजित पवार हे त्यांच्याशी न बोलताच पुढे निघून गेल्याचं दिसत आहे.

अजितदादांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं? तो Video समोर
| Updated on: Mar 02, 2025 | 9:02 PM

उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सत्ताधारी पक्षाकडून चाहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला महायुतीचे जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते, तर दुसरीकडे विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घालण्यात आला.  या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजित पवार हे मुंडे यांच्याशी न बोलताच पुढे निघून गेले. त्यामुळे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याशी बोलणं टाळलं का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

करुणा शर्मा यांचा गौप्यस्फोट

दरम्यान उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, अधिवेशनाच्या एक दिवस आधीच आज करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.   मला शंभर टक्के याबाबत माहिती मिळाली आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे.  त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. करुणा शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आले असतानाच आता हा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

सह्याद्री अतिथिगृहात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे, व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र अजित पवार हे त्यांच्याशी न बोलताच तसेच पुढे निघून गेल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही, पण वाल्मिक कराड हा हत्येतील आरोपी आहे, कराड आणि धनंजय मुंडे यांचा जवळचा संबंध होता, त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, तसा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे असं आठवले यांनी म्हटलं आहे.