
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री या नात्याने बीडमध्ये आहेत. ते आज डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. जिल्ह्यात विकासाकामांसाठी निधी वाटपाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असते. या बैठकीला बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार-खासदार उपस्थित असणार आहेत. हे आमदार-खासदार आपपाल्या मतदारसंघातील विकास कामांचे प्रस्ताव मांडून निधी मिळवण्याचा प्रयत्न करतील. या बैठकीला आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस सुद्धा उपस्थित असणार आहेत. सुरेश धस अलीकडे सतत चर्चेत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय त्यांनी लावून धरला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडच या हत्येमागचा मास्टरमाइंड असल्याचा त्यांचा दावा आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे धस यांनी यावरुन धनंजय मुंडे यांना सुद्धा टार्गेट केलं. सध्या वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात बंद आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरेश धस आणि धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत.
‘आका की जय हो’
या डीपीडीसीच्या बैठकीआधी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यात ते बोलले की, “बीड विषयी वेगवेळ्या बातम्या पेपरमध्ये वाचत असतो. जिथे तथ्य असेल, तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल. पण जिथे तथ्य नाही, तिथे कारवाईचा प्रश्न नाही” त्यावर सुरेश धस यांना प्रतिक्रिया विचारल्यावर उत्तर दिलं. “तथ्य असेल तरच कारवाई करावी, अशी दादांना मी विनंती करणार आहे. बिगर तथ्याचं मी बोलतच नाही. आज ते डॉक्युमेंट आणि पेन ड्राइव्ह त्यांच्याकडे देणार आहे. त्यात सगळेच पुरावे आहेत. आका की जय हो” असं सुरेश धस म्हणाले. सध्या बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. बीडमधील गुन्हेगारी, खंडणीखोरी एक गंभीर मुद्दा बनली आहे. त्यावर बीडमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे.