
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बारामतीत जनसागर लोटल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बारामती ही शोकसागरात बुडाली असून शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत.
अजित पवार यांचे पार्थिव काल रात्री त्यांच्या सहयोग निवासस्थानी होते. जिथून ते पहाटेच त्यांच्या काटेवाडी या मूळ गावी नेण्यात आले.
सकाळी ६ ते ९: काटेवाडी येथील निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सकाळी ९ वाजता: काटेवाडीहून हे पार्थिव रुग्णवाहिकेने ग. दि. मा. सभागृह येथे आणले जाईल.
सकाळी १० वाजता: ग. दि. मा. सभागृह ते विद्या प्रतिष्ठान दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात येईल.
सकाळी ११ वाजता: विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.
या अंत्यविधीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्यातील अनेक मोठे नेते बारामतीत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी बारामती विमानतळावर पोलिसांसह NDRF चे पथक तैनात करण्यात आले आहे. सुमारे २ ते ३ लाख लोक या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. सध्या पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ आज पुणे शहर आणि बाजार समिती (मार्केट यार्ड) मध्ये व्यापारी संघटनेने कडकडीत बंद पुकारला आहे. तसेच नाशिक बाजार समितीमधील सर्व लिलाव आणि व्यवहार आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, उच्च पदस्थ व्यक्तीच्या अपघाती मृत्यूचा नियम लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) कडे सोपवला जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे पोलीस सलामीसह अंत्यसंस्कार करण्यात आले.