Maharashtra Flood : मोठी बातमी! अजितदादांच्या मंत्री, आमदारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, थेट पत्र आलं समोर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांचा एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. तशी घोषणा अधिकृतपणे करण्यात आली आहे.

Maharashtra Flood : मोठी बातमी! अजितदादांच्या मंत्री, आमदारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, थेट पत्र आलं समोर
ajit pawar
Updated on: Sep 24, 2025 | 6:07 PM

Maharashtra Flood : सध्या राज्यात पावसाने हकर केला आहे. मराठवाड्यात तर मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. लोकांची घरे, भांडीकुंडी वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पावसामुळे वाहून गेले आहे. हाता-तोंडाशी आलेले खरीप हंगामातील पीक नेस्तनाबूत झाले आहे. याच कारणामुळे निमय आणि अटी बाजूला ठेवून सरकारने शेतकऱ्यांना सढळ हातांनी मदत करावी अशी मागणी केली जात आहे. सरकारनेही आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीने मदत करू, असे आश्वासन दिले आहे. सोबतच आम्ही केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत मागणार असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

मंत्री, आमदार, खासदारांचा एका महिन्याचा पगार…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे.

अजितदादा मराठवाड्याच्या दौऱ्यावर

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.

शेतकऱ्यांना ततडीने मदत करण्याची सूचना

अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम करावे, अशीही सूचना अजित पवार यांनी आपले पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केली आहे. दुसरीकडे लाखो हेक्टरमध्ये पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याची माहिती केंद्रालाही दिली जाईल आणि केंद्र सरकाररकडून आर्थिक मदत मागितली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून नेमकी किती मदत मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.