
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला येत होते, पण विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच विमान क्रॅश झाले. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अपघाताची बातमी समोर येताच अजित पवार यांच्या बारामतीतील फार्महाऊसवर एक हृदयद्रावक प्रसंग घडला. अपघाताच्या वेळी अजितदादांच्या आई आशाताई पवार टीव्ही पाहत बसल्या होत्या. फार्महाऊसचे मॅनेजर संपत धायगुडे यांनी माध्यमांशी बोलताना हा मन सुन्न करणारा प्रसंग सांगितला.
फार्महाऊसवर नेमकं काय घडलं?
संपत धायगुडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की सकाळी सात वाजता आशाताई नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत बसल्या होत्या. आम्ही त्यांना नाश्ता देण्याची तयारी करत होतो. त्यानंतर साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अचानक ‘अजित पवार यांचे विमान कोसळले’ अशी बातमी झळकली. आईंनी लगेच आम्हाला विचारले, “अरे, दादांचा अपघात झालाय का? काही झालंय का?”
आम्हाला वाटले, कदाचित खरचटले असेल, काही गंभीर नाही. पण पुढे बातम्या येऊ लागल्या, ‘अजित पवारांना बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले’, ‘प्रकृतीबाबत माहिती येणार’ अशा बातम्या. आईंनी हे सर्व ऐकू नये म्हणून आम्ही तातडीने बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडल्याचे सांगितले. त्यांचा मोबाईलही फ्लाइट मोडवर टाकून दिला. “काहीच झालेलं नाही, दादा सुरक्षित आहेत,” असे आम्ही त्यांना सांगत होतो.
पण आशाताई कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या. “दादांना भेटून येऊ, चला,” असे म्हणत त्या फार्महाऊसच्या बाहेर चालत निघाल्या. ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचे सांगितले, पण त्या ऐकल्या नाहीत. शेवटी नाईलाजाने आम्ही त्यांना बारामतीतील बंगल्यावर घेऊन गेलो. तिथे त्यांना सत्य समजले आणि त्यांचे डोळे भरून आले. या प्रसंगाने फार्महाऊसवरील प्रत्येकजण हादरून गेला. आशाताईंच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि हा शोक पाहणाऱ्यांच्या काळजाला तडा गेला.
नेमकं काय घडलं?
बारामतीत झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पूर्ण राजकीय सन्मानाने पार पडणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) यांनी दिली आहे.