
28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळाजवळ घडलेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि प्रभावशाली नेते होते. तसेच इतर पीडितांच्या कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला.
पिंकी माळीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
29 वर्षीय पिंकी माळी या फ्लाइट अटेंडंटचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तिच्या निधनाची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले. पिंकीचे पार्थिव प्रथम तिच्या सासरी कळवा येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. तेथे तिच्या पती सोमकर यांनी अंत्यदर्शन घेतले. हे जोडपे तीन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले होते. पिंकीच्या आवडीनुसार तिचा पती कळवा येथे फर्निचरचा व्यवसाय करत होता. दोघेही सोसायटीतील कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असत आणि सर्वांशी मिळून-मिसळून राहत. रहिवाशांकडून त्यांच्या जोडीचे नेहमी कौतुक होत असे.
पिंकीच्या पार्थिवाला नंतर तिच्या माहेरी वरळी येथे नेण्यात आले. तेथे तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. पती सोमकर यांना हे दुःख पचवणे अत्यंत कठीण जात आहे. पिंकीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोक व्यक्त केला. तिच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. जड अंत: करणाने तिला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
विदीप जाधव यांचे पार्थिव तरडगावात
अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील तरडगाव (फलटण तालुका) येथे नेण्यात आले आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी अपघाताने अनेकांना धक्का बसला आहे. महाराष्ट्राने एक प्रभावी नेते आणि अनेकांच्या आयुष्यातील आधार गमावला.