भाजपच्या घोटाळ्यांच्या फाईल्सबद्दल बोलले अन् 13 दिवसात..; अजित पवारांचा मृत्यू की घातपात? संजय राऊतांचे 5 खळबळजनक सवाल

अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अधिक वाढले आहे. संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या ५ प्रश्नांनी खळबळ उडवून दिली असून, विमानातून प्रवास करणारा 'सहावा' प्रवासी नेमका कोण होता? असा सवाल आता विचारला जात आहे.

भाजपच्या घोटाळ्यांच्या फाईल्सबद्दल बोलले अन् 13 दिवसात..; अजित पवारांचा मृत्यू की घातपात? संजय राऊतांचे 5 खळबळजनक सवाल
ajit pawar
| Updated on: Feb 02, 2026 | 12:12 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना सकाळी ८.४६ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे विमान धावपट्टीपासून काही अंतरावरील एका शेतात कोसळले. हे विमान जमिनीवर आदळताच त्याचा भीषण स्फोट झाला. या घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानिक आणि कर्मचारी अशा एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. आता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू ही केवळ एक दुर्घटना नसून त्यामागे मोठे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संजय राऊत यांनी याची तुलना थेट जस्टिस लोया प्रकरणाशी केली असून भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या काळावर बोट ठेवताना एक खळबळजनक दावा केला. १५ जानेवारीला अजित पवारांनी जाहीर केले होते की, त्यांच्याकडे भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांच्या फाईल्स आहेत आणि त्या ते लवकरच उघड करणार आहेत. या विधानानंतर अवघ्या काही दिवसांत, म्हणजे २८ तारखेला त्यांचा मृत्यू होतो, हा योगायोग नक्कीच नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

अजित दादा पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत परतण्याच्या तयारीत होते. त्यामुळे भाजपची दहशत मोडली असती, जे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नव्हते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यासोबतच संजय राऊतांनी या तपासावर ५ गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी या घटनेला अपघात मानण्यास नकार दिला आहे.

संजय राऊतांनी उपस्थित केलेले सवाल

  1. सहावा प्रवासी कुठे आहे?: विमानात ६ प्रवासी असताना केवळ ५ मृतदेहच का सापडले? तो सहावा व्यक्ती कोण होता आणि तो कुठे गायब झाला?
  2. कागदपत्रे सुरक्षित कशी?: ज्या भीषण आगीत मानवी देहांचे कोळसा झाले, तिथे अजित पवारांच्या शेजारी असलेले कागद सुरक्षित कसे राहिले? ते जळाले का नाहीत?
  3. मेंटेनन्स सर्टिफिकेटचा अभाव: राज्याचा उपमुख्यमंत्री ज्या विमानातून प्रवास करतो, त्या विमानाचे ‘मेंटेनन्स सर्टिफिकेट’ नसताना उड्डाणाला परवानगी कोणी आणि का दिली?
  4. सुरक्षेत हलगर्जीपणा: इतक्या मोठ्या नेत्याच्या प्रवासावेळी सुरक्षेचे निकष का पाळले गेले नाहीत?
  5. अमोल मिटकरींचे प्रश्न: आमदार अमोल मिटकरी यांनीही यापूर्वी यावर शंका उपस्थित केली असून, जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.

मास्टरमाइंड समोर येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही

दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधताना संजय राऊत यांनी प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र ताशेरे ओढले. ज्या विमानात राज्याचा उपमुख्यमंत्री बसतो, तिथे सुरक्षेची इतकी मोठी हेळसांड कशी होऊ शकते? हा निव्वळ अपघात नसून लोकशाहीला काळिमा फासणारा घातपात असू शकतो. हे प्रकरण मी संसदेत लावून धरणार आहे. तसेच यामागील मास्टरमाइंड समोर येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असेही संजय राऊतांनी सांगितले.