काही गोष्टी मनात..; कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांचा सल्ला

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पंचनाम्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सल्ला दिला आहे. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात, असं ते म्हणाले. आता ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल कोकाटेंनी केला होता.

काही गोष्टी मनात..; कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांचा सल्ला
Manikrao Kokate and Ajit Pawar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2025 | 2:53 PM

काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दिला आहे. कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, असंही ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आणि शेतकरी मदतीसाठी आशेनं सरकारकडे पाहत असताना कोकाटे यांचं असं वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

माणिकराव कोकाटेंना अजूनही गोष्टी मनात ठेवायची सवय नाही. आता मला जास्त महागात पडतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. याबाबत मी मागेही त्यांना सांगितलं होतं. शेतकरी हा बळीराजा आहे, आपला पोशिंदा आहे. सगळ्या गोष्टी आम्हालाही माहीत आहेत, आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून का दाखवायच्या? मनात ठेवायच्या”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

एकीकडे ढेकळांच्या पंचनाम्याचं त्यांचं वक्तव्य चर्चेत असतानाच कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारी टिप्पणी केली होती. “कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खातं दिलंय”, असं ते म्हणाले. कोकाटे यांच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मी असं काही बोललोच नाही” असं ते म्हणाले. “राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. फळबागांचं नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही भागात कांद्याच्या पिकाचंही नुकसान झालं आहे. जेवढं नुकसान झालंय, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. हे नैसर्गिकच आहे. सोयाबीन आणि कापसाचं पिक फारसं उरलेलं नाही. उभ्या असलेल्या फळबागा महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे पंचनामे करणं गरजेचं आहे”, अशी सारवासारव त्यांनी केली.