10 हजार देतो, मुलीला एक रात्र… आरोपी महिलेच्या मुलीवर पोलिसाची वाकडी नजर, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाला…

अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये एएसआय राजेश जाधव याने आरोपी महिलेकडे तिच्या मुलीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोषी पोलिसावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

10 हजार देतो, मुलीला एक रात्र... आरोपी महिलेच्या मुलीवर पोलिसाची वाकडी नजर, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाला...
women crime
| Updated on: Apr 01, 2026 | 8:54 AM

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. मात्र अकोल्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने (ASI) या ब्रीदवाक्याला हरताळ फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपी महिलेला तुझ्या मुलीला आणून दे, अशी मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्या मुलीला १० हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा खळबळजनक आरोप या पोलीस कर्मचाऱ्यावर झाला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये काल सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ८० लाखांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपी महिलेला एका लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेला ASI राजेश जाधव याने या महिलेकडे तिच्या मुलीच्या वयाची चौकशी केली. यानंतर त्याने तुझ्या मुलीला १० हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव अशी अश्लील मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय अनिल जुमळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेने हंबरडा फोडत घडलेला सर्व प्रकार जुमळे यांना सांगितला. यावेळी संतापलेल्या जुमळे यांनी संबंधित ASI राजेश जाधव याला जाब विचारला. त्यानंतर रागाच्या भरात त्याच्या कानशिलात मारण्यासाठी हात उगारला. मात्र, समोरचा कर्मचारी पोलीस वर्दीत असल्याने त्यांनी स्वतःला सावरले. वर्दी घातली आहेस ना तू, असं कृत्य करताना लाज कशी वाटली नाही? अशा शब्दांत त्याला फटकारले.

व्हिडीओमधील धक्कादायक संभाषण

  • पीडित महिला: साहेब, याने मला विचारलं तुझ्या मुलीचं वय किती आहे? मी म्हटलं २७ वर्ष आहे. तर हा म्हणतो, अशा वयाच्या मुली छान असतात… १० हजार रुपये देतो, तिला माझ्याकडे पाठव.
  • ASI राजेश जाधव: मी असं एक शब्द तरी बोललो का? सांग यांना…
  • पीआय अनिल जुमळे: थांबा हो… आवाज नाही. तिला बोलू द्या काय म्हणतेय ते.
  • उपस्थित महिला पोलीस कर्मचारी: माझ्यासमोर तर हे काही बोलले नाहीत, पण नंतर बोलले असतील तर मला माहिती नाही.
  • पीडित महिला: हाच बोलला साहेब! १० हजार देतो, एक रात्रीसाठी तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव… साहेब, गुन्हा मी केलाय, माझ्या मुलीने नाही केला. मग तिच्याबद्दल असा शब्द हा कसा काय वापरू शकतो?
  • पीआय अनिल जुमळे : (संतापून ASI ला) “असं कृत्य करताना तुला लाज कशी वाटली नाही? वर्दी घातली आहेस ना तू!”
  • (त्यानंतर पीआय जुमळे यांनी फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली माहिती):
  • पीआय अनिल जुमळे: “जय हिंद सर, मी पीआय जुमळे बोलतोय. सायबरची एक महिला आरोपी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे. या ठिकाणी गार्डवर असलेला ASI राजेश जाधव तिला विचारतोय की तुझ्या मुलीचं वय काय? आणि पुढे म्हणतोय की, १० हजार रुपये देतो, मुलीला रात्रभर माझ्याकडे पाठव. सर, हा राजेश जाधव आहे, सिव्हिल लाईनचा.”

निलंबनाची कारवाई प्रस्तावित

या धक्कादायक प्रकारामुळे अकोला पोलिसांची मान शरमेने खाली गेली आहे. पोलीस ठाण्यातच महिला सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. हा संबंधित ASI राजेश जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us