मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप, राज ठाकरेंचा पोलिसांना अल्टिमेटम, नेमकं काय म्हणाले?

दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून या पुतळ्याची पहाणी करण्यात आली.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप, राज ठाकरेंचा पोलिसांना अल्टिमेटम, नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2025 | 6:15 PM

दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून या पुतळ्याची पहाणी देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी शंका यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. तर 24 तासांच्या आत आरोपींना शोधा अशा सूचना राज ठाकरे यांनी पोलिसांना केल्या आहेत.

दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप शिवेसना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे, त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पहाणी करण्यात आली, यावेळी उद्धव ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया?

मी पुन्हा एकदा सांगोत ज्याला आपल्या आई-वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, अशा कोणीतरी एका बेवारस माणसानं हे कृत्य केलं असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा हा महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मी स्वत: पोलिसांशी बोललो आहे, आणि ज्याने कोणी हे केलं आहे, खरं म्हणजे हा खूप दुर्दैवी प्रकार आहे. या घटनेची जेवढी निंदा करावी, जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पोलिसांना सूचना दिल्या आहेत, ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याला तातडीनं अटक करावं, त्याच्यावर कठोर कारवाई करावी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी पार्क परिसरात आले होते. त्यावेळी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचं कार्यकर्त्यांना दिसलं, कार्यकर्त्यांकडून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. लाल रंग नेमका कोणी टाकला याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून देखील पुतळा परिसरात पहाणी करण्यात आली. दरम्यान सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून स्थानिक शिवसैनिक देखील घटनास्थळी हजर आहेत.