मी राज ठाकरेंच्या घरात वाढलोय… गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेचं विधान चर्चेत

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यावर नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. आज पत्रकार परिषद घेत अमित ठाकरे यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मी राज ठाकरेंच्या घरात वाढलोय... गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेचं विधान चर्चेत
Amit and Raj Thackeray
Updated on: Nov 17, 2025 | 5:43 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी रविवारी नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. चार महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नाही म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला होता. याची माहिती मिळताच अमित ठाकरे यांनी त्याचे उद्घाटन केले. यावेळी जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराजांसाठी पहिली केस झाली…

गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, मी आज दिवसभर हसतोय, महाराजांसाठी पहिली केस झाली असेल तर चांगलं आहे. मला बरं वाटतंय. काल दिघा आणि कोपर खैराणे ला गेलेलो. गजानन काळे सोबत होते. त्यांनी सांगीतलं की महाराजांचा पुतळा आहे पण चार महिने अनेक आंदोलने करून देखील खुला केला नाही. काल त्या ठिकाणी मी गेलो आणि उद्घाटन केले.

आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, त्यांनी पोस्ट टाकली त्यामुळे आदित्यजींचे धन्यवाद. मी त्यांना भेटायला चाललो आहे, मात्र विषय वेगळा. आज यावर चर्चा होणार नाही.

महाराजांसाठी मराठी माणूस पेटून उठतो

पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, महाराजांसाठी मराठी माणूस पेटून उठतो. गेल्या चार महिन्यात ते एअरपोर्टला गेले दहीहंडीला गेले पण त्यांना उदघाटन करायला वेळ नाही मिळाला. त्यांनी पुन्हा कपडा बांधला तर आम्ही पुन्हा ओपन करू. पुतळा लोकांना दर्शनासाठी खुला केला आहे. पोलिसांचे काम आहे, त्यांना मी काही बोलणार नाही कारण पोलिसांवर वरून प्रेशर असतो.

मी राज ठाकरेंच्या घरात वाढलोय…

यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जाब विचारणार का? या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जाब विचारणार नाही, पण महाराष्ट्र मध्ये असे पुतळे कुठे बंद करून ठेवले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते नागरिकांसाठी ओपन केल्या शिवाय राहणार नाही. पुढे अमित ठाकरे यांना तुम्हाला आता कोर्टात जावं लागेल असा प्रश्न विचारला, यावर बोलताना ते म्हणाले की, मी राज ठाकरेंच्या घरात वाढलो आहे. त्यामुळे आम्हाला कोर्ट कचेरीचा त्रास नाही, पण आम्ही कोर्टात उत्तर देऊ. कबुतरांपेक्षा महाराजांसाठी माझ्यावर केस झाली तर मला काही हरकत नाही.