धक्कादायक! बच्चू कडूंना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या, अंत्यसंस्कारावरुन येताना भावाचा हार्टअटॅकने मृत्यू

| Updated on: Dec 23, 2020 | 1:35 PM

अंगाखांद्यावर खेळवलेल्या धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का मोठे बंधू संजय भुयार यांना सहन झाला नाही.

धक्कादायक! बच्चू कडूंना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या, अंत्यसंस्कारावरुन येताना भावाचा हार्टअटॅकने मृत्यू
Follow us on

अमरावती : लहान भावाच्या आत्महत्येचा धक्का पचवत असतानाच अमरावतीतील भुयार कुटुंबावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला. शेतकरी अशोक भुयार यांच्या अंत्यसंस्कारावरुन परत येताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मोठ्या भावानेही प्राण सोडले. त्यामुळे एकाच दिवशी दोघा भावांना अखेरचा निरोप देण्याची दुर्दैवी वेळ भुयार कुटुंबावर ओढवली आहे. (Amravati Farmer dies of Heart attack after brother commits Suicide)

देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली. अमरावतीतील बडे नेते बच्चू कडू यांना पत्र लिहून शेतकरी अशोक भुयार यांनी काल आत्महत्या केली होती. अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील संत्रा उत्पादक अशोक भुयार यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.

बच्चू कडूंना न्याय देण्याची मागणी

व्यापाऱ्याने संत्र्याचे पैसे न दिल्याने आणि पोलिसांनीही सहकार्य न केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी केला होता. व्यापारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा दावाही त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. बच्चू कडू यांच्याकडे भुयार यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी चिठ्ठीतून केली होती.

पोलिसासह व्यापाऱ्यावर गुन्हा

भुयार यांच्या आत्महत्येनंतर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याला गावकऱ्यांनी घेराव घातला होता. ठाणेदार आणि बीट जमादारावर कारवाई करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्यासह संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोठ्या भावाला विरह असह्य

अशोक भुयार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलेल्या धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का मोठे बंधू संजय भुयार यांना सहन झाला नाही. अंत्यसंस्कारावरुन परत येताना हार्ट अटॅक आल्याने संजय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच दिवशी दोन भावांचा मृत्यू झाल्याने अमरावती जिल्हात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या

देशात वर्षभरात 10 हजार 281 शेतकरी आत्महत्या, दुर्देवाने महाराष्ट्राचा क्रमांक पहिला

(Amravati Farmer dies of Heart attack after brother commits Suicide)