अमरावतीत सूर्याचा कोप, 48 तासांत 3 जणांचा तडफडून मृत्यू; प्रशासनाचा हायअलर्ट

अमरावती जिल्ह्यात उन्हाचा थरार पाहायला मिळत असून गेल्या दोन दिवसांत उष्माघाताने तिघांचा बळी घेतला आहे. तापमान ४७ अंशांवर पोहोचले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अमरावतीत सूर्याचा कोप, 48 तासांत 3 जणांचा तडफडून मृत्यू; प्रशासनाचा हायअलर्ट
amravati
| Updated on: May 25, 2026 | 9:32 AM

विदर्भातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्यामुळे तापमान ४५ ते ४७ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांत तीन तालुक्यांत तिघांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) तीव्रता पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू असल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गेल्या ४८ तासांत अमरावतीच्या वेगवेगळ्या तीन तालुक्यांत तीन मृत्यूची नोंद झाली आहे.

अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील काकडा येथील रहिवासी असलेले ४० वर्षीय विलास काटे यांचा तीव्र उन्हामुळे मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अति दारू सेवन आणि त्यानंतर उन्हाचा बसलेला तीव्र फटका यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनेगाव या ठिकाणी एक हृदयद्रावक घटना घडली. या ठिकाणी ७० वर्षीय वृद्ध उकटराव भंडारे हे दुपारच्या सुमारास उन्हाच्या तडाख्यात सापडले. वयोमानामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी असल्याने उष्माघाताचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुकडी गुरव येथील संजीव पुसदकर यांचा बळी गेला आहे. प्रचंड उन्हाचा तडाका आणि त्यातच केलेले अति मद्यपान यामुळे त्यांचा शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी होऊन (Severe Dehydration) मृत्यू ओढवला.

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; जनजीवन विस्कळीत

अमरावतीत सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात होते, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत गरम वाऱ्यांचे थैमान पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिका आणि जलसाठे झपाट्याने आटत चालल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. शेतमजूर, बांधकाम कामगार आणि फेरीवाले यांचे अतोनात हाल होत असून दुपारच्या सत्रातील सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने वाढते मृत्यू सत्र पाहता नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
  • तहान नसली तरी सतत भरपूर पाणी प्या. घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली, लिंबू पाणी, ताक, किंवा ओआरएस (ORS) चे द्रावण सोबत ठेवा.
  • कडक उन्हात किंवा दुपारी मद्यपान, चहा, कॉफी आणि अमली पदार्थांचे सेवन करणे टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.
  • घराबाहेर पडताना हलके, सैल आणि सुती (Cotton) कपडे वापरा. डोक्यावर टोपी, रुमाल आणि डोळ्यांवर गॉगलचा वापर करा.

दरम्यान अमरावती जिल्ह्यातील ही परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Follow Us