नगरपरिषदेत मटन पार्टीची मेजवानी अन् मित्रपक्षांमध्येच राजकीय कुरघोडी! भाजपने कारवाईसाठी दंड थोपटले, शिंदेसेनेनेही सुनावले

Mutton Party in Amravati: मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर मटण पार्टी करण्यात आली आहे. यामुळे भाजप-शिंदेसेनेत राजकीय राडा दिसून येत आहे. नगराध्यक्षांवर कारवाईची मागणी होत आहे.

नगरपरिषदेत मटन पार्टीची मेजवानी अन् मित्रपक्षांमध्येच राजकीय कुरघोडी! भाजपने कारवाईसाठी दंड थोपटले, शिंदेसेनेनेही सुनावले
Mutton Party Row Heats Up Morshi Politics
| Updated on: Nov 16, 2026 | 10:24 PM

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषद सध्या एका मटण पार्टीवरून चांगलीच चर्चेत आली आहे. नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांसाठी मटण पार्टी आयोजित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेने भाजपच्या आरोपांना राजकीय षडयंत्र असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांची मटण पार्टी झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप आमदार उमेश यावलकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आहे.

Loading...

या निवेदनातून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उपनगराध्यक्ष तसेच संबंधित नगरसेवक आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यालयाच्या इमारतीत अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र भाजपच्या या आरोपांनंतर शिंदे शिवसेनेनेही पलटवार केला आहे.

याआधी भाजपच्या महिला व बालकल्याण सभापतींनीदेखील नगरपरिषदेत तब्बल 200 ते 250 लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. मग त्यावेळी भाजपने कोणती भूमिका घेतली होती, असा सवालही उपस्थित केला जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक रवी गुल्हाने यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप केला. तर उपनगराध्यक्षांनीही भाजप विरोधात असल्यामुळे जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

मटण पार्टीच्या मुद्द्यावरून मोर्शी नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. एका जेवणाच्या कार्यक्रमावरून सुरू झालेला हा वाद आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात पोहोचला आहे. त्यामुळे भाजपच्या मागणीवर जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात आणि संबंधितांवर काही कारवाई होते का, याकडे आता मोर्शीकरांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us