
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित दादांसह विमानत असलेल्या चार जणांचा देखील मृत्यू झाला. काल बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मात्र, खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.
दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले?
दादा कधी रडत बसले नाहीत. काल आपण सगळे रडलो, आजही रडू आवरत नाहीये. पण आता रडायचं नाही लढावं लागेल दादांचे विचार आणि स्वप्न साकार करायचे असेल, तर आता कामाला लागायचं आहे, असा निर्धार मोहिते पाटीलांनी कार्यकर्त्यां समोर केला. दादांना संपवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण दादा संपले नाहीत. कामाची आवड असलेले, दूरदृष्टी असणारे आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणारे दादा म्हणजे अजरामर व्यक्तिमत्त्व होतं असे देखील मोहिते पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, पुणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हीच दादांची तळमळ होती. आज त्या तळमळीचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं स्पष्ट शब्दांत मांडत पुणे जिल्ह्यात दादांइतकी ताकद, दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांप्रती बांधिलकी आज कोणत्याही नेत्यात नाही अशी खंत मोहिते पाटीलांनी व्यक्त केली. अजित पवारांनंतर जिल्ह्यात एकही नेता नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भावनिक आणि प्रेरणादायी भाषणानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण केली आहे.
नेमका कसा झाला अपघात?
अजित पवार हे 28 जानेवारी रोजी पहाटे बारामती दौऱ्यावर निघाले होते. पहाटे मुंबईतून बारामतीला निघालेल्या अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत विमानात असलेल्या इतर पाच जणांचेही निधन झाले आहे.
अपघातात कोणाचा मृत्यू?
अजित पवार: उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.
विदिप जाधव: मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे पीएसओ (PSO).
कॅप्टन सुमित कपूर: विमानाचे मुख्य पायलट (PIC).
कॅप्टन शांभवी पाठक: को-पायलट (FO).
पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.