‘दीनानाथ’ प्रकरणात ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ची उडी, डॉ. केळकरांना ‘ते’ दोन शब्द भोवणार? नेमकं काय होणार?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या रुग्णालयातील डॉ. धनंजय केळकर यांनी वापरलेल्या दोन शब्दांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

दीनानाथ प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलनची उडी, डॉ. केळकरांना ते दोन शब्द भोवणार? नेमकं काय होणार?
dr dhananjay kelkar and deenanath mangeshkar hospital
| Updated on: Apr 08, 2025 | 8:16 PM

Deenanath Hospital Case : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या रुग्णालयाने महिलेच्या प्रसूतीसाठी 10 लाख रुपये अनामत रुक्कम म्हणून मागितले होते, असा आरोप केला जातोय. त्यानंतर या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. डॉ. धनंजय केळकर यांनी 7 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत राहू-केतूचा उल्लेख करून 10 लाख रुपयांच्या डिपॉझिटसंदर्भात स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आता याच दोन शब्दांवर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेने मोठी मागणी केली आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेने नेमकी काय मागणी केली?

डॉ. धनंजय केळकर यांच्या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. पुण्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य विशाल विमल यांनी याबाबत समितीची भूमिका मांडली आहे. राहू केतू असल्यामुळे 10 लाख रुपये डिपॉझिट लिहून दिले, असा अशास्त्रीय दावा डॉ. केळकर यांनी केला आहे. एखादा रुग्ण जर दगावला त्यावेळीही रुग्णालय राहू केतू होता असं सांगणार का? विज्ञान शाखेचे असणारे डॉ. केळकर आणि घैसास यांना शास्त्रीय ग्रहाबद्दल माहिती नसणे हे अत्यंत धक्कादायक आहे, असे विशाल विमल म्हणाले आहेत. तसेच वैद्यकीय आयोगाने. डॉ केळकर यांचा डॉक्टरकीचा परवाना रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केल आहे.

डॉ. केळकर नेमकं काय म्हणाले होते?

डॉ. केळकर यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन 10 लाख अनामत रकमेच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. आमच्या रुग्णालयात डिपॉझिट मागण्याची पद्धत नाहीये, असे त्यांनी सांगितले होते. तसेच “डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्याकडे नाहीये. माझ्याकडे हा रुग्णाच्या अॅडमिशनचा पेपर आहे. या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले आहे. प्रत्येक रुग्णाला हा पेपर दिला जातो. हा फक्त भिसे नव्हे तर प्रत्येक रुग्णाला हा पेपर दिला जातो. या पेपरवर कोणते डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत? त्याला खर्च किती येईल? याबाबत माहिती दिलेली असते. या पेपरवर डिपॉझिट लिहिण्याची पद्धतच नाही. परुंतु काही कारणांमुळे डोक्यात राहू-केतू डोक्यात आला. डॉक्टरांनी एक चौकोन करून 10 लाक रुपये डिपॉझिट म्हणून लिहिलं आहे. ही गोष्ट खरी आहे. पण असं कोणीही लिहित नाही. मी इथे रोज दहा शस्त्रक्रिया करतो. मी माझ्या आयुष्यात अशा प्रकारे काहीही लिहून दिलेलं नाही,” असं स्पष्टीकरण केळकर यांनी दिलेलं आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, आता या प्रकरणात ज्या डॉ. सुश्रुत घैसास या डॉक्टरांवर आरोप होत आहेत, त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील पदावरून आपला राजीनामा दिलेला आहे. लवकरच या प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.