राष्ट्रवादीचे आमदार पिशव्या भरून तयार आता…, संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवार गटाच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच संजय राऊत यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांबाबत मोठा दावा केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या संदर्भात विविध पक्षातील नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांबाबत मोठा दावा केला होता. राष्ट्रवादीचे 20 ते 22 आमदार फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल पाटील?
संजय राऊत जे विधान करतात, की आमचे 25 आमदार या पक्षात जाणार 22 आमदार त्या पक्षात जाणार. आमच्या आमदारांच्या कपड्यांच्या पिशव्या भरून तयार आहेत आणि संजय राऊत यांच्याकडे जायचं आहे. संजय राऊत यांना विचारणा करायची की आता आम्ही कुठल्या पक्षात जायचं? असा टोला यावेळी अनिल पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे. दरम्यान संजय राऊत हे बेसलेस विधान करत आहेत. विधान परिषद निवडणुकीवेळी देखील राऊत असंच बोलायचे अन् मग तोंडावर पडले. राष्ट्रवादी पक्षाचा आमदार कुठे जाणार नाही हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना पाटील यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांच्यावर देखील चांगलाच हल्लाबोल केला आहे. विलीनीकरणाचा प्रश्न आमच्या पक्षाच्या स्तरावर कुठेही सुरू नाही. विलीनीकरणाचा मुद्दा सुरू असेल तर त्यावर बोलण्याचा मुळात रोहित पवारांना कुठलाही अधिकार नाही. रोहित पवारांनी आपला पक्ष तपासला पाहिजे, आपल्या पक्षात किती आमदार आहेत ते तपासले पाहिजे. अशी खोचक टीका यावेळी अनिल पाटील यांनी केली आहे. विलीनीकरणाबद्दल भाजपला सोडून बोलायचं तर चर्चात होऊ शकत नाही. भाजप हा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष आहे, असंही यावेळी अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.