त्याच दिवशी अजितदादा, शरद पवार एकत्र येणार होते, सगळं ठरलं होतं, पण…, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे, दरम्यान दुसरीकडे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे.

त्याच दिवशी अजितदादा, शरद पवार एकत्र येणार होते, सगळं ठरलं होतं, पण..., राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी
ncp
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 7:30 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला, विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं, विमानाचा मोठा स्फोट होऊन आग लागली. या घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बारामतीमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘आज मला राहून राहून दुःख होत आहे, की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अजित दादा यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला होता. महापालिका निवडणुकीत आम्ही एकत्र आलो होतो, काही प्रमाणावर आम्हाला यश आलं, 12 डिसेंबर रोजीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, पण तसं झालं नाही. अजितदादा यांच्या हयातीत दोन्ही पक्ष एकत्र आले नाहीत ही खंत आज ही माझ्या मनात आहे, असं यावेळी बोलताना अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण, अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासंदर्भात देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच ठेवण्यात येणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री मिळावं अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचं नाव देखील उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.