श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये “कही खुशी कही गम”

| Updated on: Aug 07, 2021 | 6:04 PM

धान्य आणि मसाला मार्केटमध्ये देखील ग्राहकांची वर्दळ वाढली असून, मालाला उठाव वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे श्रावण महिन्याचा परिणाम एपीएमसी मार्केटच्या विविध बाजारपेठांवर होणार असल्याचे दिसत आहे.

श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये कही खुशी कही गम
apmc market
Follow us on

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आषाढच्या शेवटच्या दिवशी गर्दी पाहायला मिळाली. सोमवारपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भाजीपाला आणि फळाला चांगली मागणी असणार हे निश्चित असते. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी दोन्ही मार्केटमध्ये चांगलीच गर्दी केलीय. तर कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसत आहेत. धान्य आणि मसाला मार्केटमध्ये देखील ग्राहकांची वर्दळ वाढली असून, मालाला उठाव वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे श्रावण महिन्याचा परिणाम एपीएमसी मार्केटच्या विविध बाजारपेठांवर होणार असल्याचे दिसत आहे.

अनेक लोकांचे सोमवार आणि शनिवारच्या दिवशी उपवास

भाजीपाला श्रावण महिन्यात अनेक लोकांचे सोमवार आणि शनिवारच्या दिवशी उपवास असतात. तर अनेक लोकांकडून मांसाहार वर्ज करून शाकाहाराला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे भाजीपाल्याला चांगलीच मागणी असते. महाराष्ट्रात परंपरेनुसार उपवास सोडताना चार ते पाच भाज्या पानात वाढून आहारात घेतात. शिवाय त्यात दोन तरी पालेभाज्यांचे सेवन केले जाते. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये महिनाभर ग्राहकांची गर्दी राहील.

मालाला चांगला उठाव राहून भाज्यांच्या दरात वाढ राहण्याची शक्यता

शिवाय आलेल्या मालाला चांगला उठाव राहून भाज्यांच्या दरात वाढ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज पासूनच श्रावण महिन्याचा परिणाम भाजीपाला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. सध्या मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात फ्लावर 25 रुपये, टोमॅटो 10 रुपये, कोबी 10 रुपये, वांगी 15 रुपये, कारले 20 रुपये, वाटाणा 40 रुपये, भेंडी 20 रुपये, पापडी 30 रुपये, घेवडा 30 रुपये किलोनं मिळत आहे.

फळांचे भाव काय?

महिन्यातून अथवा आठवड्यातून काही दिवस लोक उपवास करतात. त्यात आता श्रावणी शनिवार आणि सोमवारची भर पडणार आहे. त्यामुळे नक्कीच महिन्याभरात किमान 4 ते 5 आणि कमाल 8 ते 10 उपवास असणार आहेत. त्यामुळे उपवासादरम्यान दोन वेळेच्या जेवणाव्यतिरिक्त बाहेर काही खाणे शक्य नसल्याने लोक फलाहार घेणे पसंत करतात. त्यामुळे विविध फळांची खरेदी लोक करत असतात. परिणामी, एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. तर हंगामी फळांना चांगलीच मागणी असून सोमवारपासून अधिक मागणी वाढण्याची शक्यता एपीएमसी मार्केटमधील फळ व्यापारी व्यक्त करत आहेत. फळ बाजारात सध्या सफरचंद, डाळींब, सीताफळ, पेर व उत्तर प्रदेशचा आंबा ही फळे आहेत.

कांदा-बटाट्याचे दर किती?

नाफेडचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेडने कांदा खरेदी बंद केल्याचा परिणाम मुंबई एपीएमसी बाजारपेठेवर झाला. त्यामुळे दोन दिवसांत कांदा दर 4 रुपये प्रतिकिलोने कमी झालेत. तर आता श्रावण महिन्याचा फटका कांदा, बटाटा आणि लसूण सारख्या पदार्थाना बसणार आहे. त्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमधील कांद्यासह सर्वच शेतमालाचे भावात आणखी घसरण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय संपूर्ण महिना बाजारभाव कमी राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. सध्या बाजारात कांदा 5 ते 12 रुपये, बटाटा 5 ते 10 रुपये, लसूण 50 ते 90 रुपये प्रतिकिलो आहे.

धान्य आणि मसाल्याची किंमत काय?

आहारातील मासांहार कमी झाल्याने शाकाहार वाढणे साहजिक असून, धान्य मार्केटमध्ये डाळ आणि कडधान्य खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली आहे. महिन्याच्या पहिला आठवड्यात लोकांचे पगार होत असतात. त्यामुळे गृहिणी महिन्याभराच्या खरेदीसाठी बाहेर पडल्या असून, घरातील किराणा मालासह घरातील विविध पदार्थांची खरेदी केली जात आहे. कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती कायम राहावी अथवा वाढावी याकरिता मसाला पदार्थांची विक्री वाढली होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्राहक कमी झाले होते. तर श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी मसाल्याला चांगली मागणी असून मसाला पदार्थ खरेदीसाठी ग्राहक मसाला मार्केटमध्ये वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

संबंधित बातम्या

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक

APMC market is very crowded on the eve of Shravan month