
पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्याचा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात आर. आर. कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आर. आर. कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केली होती.
आर आर कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अनिल कस्पटे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून कस्पटे यांच्याशी संवाद साधला असताना, कस्पटे यांनी सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणात सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसरीकडे वैष्णवीची सासू लता हगवणे नणंद करिष्मा आणि पती शशांक यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे, त्यांना जामीन मिळू नये अशी इच्छा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी यावेळी व्यक्त केली.
शशांक हगवणेच्या अडचणीत वाढ
वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक हगवणे याला अटक करण्यात आली आहे, तो आता न्यायालयीन कोठडीत आहे, वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान शशांक हगवणे याचं आणखी एक प्रकरण समोर आलं असून, त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे. त्याच्याविरोधात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शशांक हगवणे याच्यावर जेसीबीच्या व्यवहार प्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशांत येळवंडे यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.