Ashish Shelar : रिक्षा चालकांना वर्षभर मुदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज का? आशिष शेलारांचं उत्तर काय
रिक्षा चालकांना वर्षभर मुदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आशिष शेलार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक वर्षांची मुतदवाढ दिली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवर होणाऱ्या कारवाईला १ वर्षांसाठी स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबईतील अमराठी रिक्षाचालकांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला. परंतु मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाने शिंदे गटात नाराजी निर्माण झाल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. या निर्णयाने खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच नाराज झाल्याची चर्चा आहे. परंतु उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजीची चर्चा मंत्री आशिष शेलार यांनी फेटाळून लावली आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी समस्त नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, ‘गेली २० वर्षा याहून अधिक काळ आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा वर्कर्स असतील यांच्यासोबत रक्षाबंधन करण्याचे सौभाग्य लागतं. अनेक चांगली कामं माझ्या बहिणी करतात. मला त्यांचाच आशीर्वाद मिळाल्याचा आनंद आहे’. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजीची चर्चा फेटाळून लावताना शेलार म्हणाले, ‘ कोणतीही नाराजी नाही. मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर मंत्र्यांचा त्याला होकारच होता. टॅक्सी चालकांना वेळ देणं हे सर्वसमावेशकच आहे’.
मराठी न आल्यास अमराठी चालकांना फटकवणार असल्याचा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘मराठीचा आग्रह आमचा पण आहे. मराठी शिकलं पाहिजेस, यासाठी तुमचे काका मुख्यमंत्री असताना कारवाई का नाही झाली? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे कारटे. आम्ही सगळ्यांना वेळ दिलाय, कायदा हातात घेता कामा नये. तुमच्या काकांनी का केलं नाही, असा प्रश्न त्यांनी विचारावा किंवा कांग्रेसला विचारावा’.
महापौरपद हे पुढील अडीच वर्षांसाठी शिंदे गटाला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर आशिष शेलार म्हणाले, ‘शिंदे आमचे नेते, ते अनौपचारिक बोलले असतील, तर मी औपचारिक का बोलावे? मुख्यमंत्री आणि त्यांचे बोलणे झालं असेल, तर माहिती नाही’. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर शेलार म्हणाले, ‘ मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांना त्यांचा अधिकार मिळायलाच हवा. सरकार अपेक्षेप्रमाणे काम करत आहे. काही गोष्टी राहिल्या असतील तर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री बोलले आहेत’.