आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे जमा करणारा विशाळ माझाच सहकारी…अखेर सुरेश धस यांची कबुली

आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी मान्य केले आहे. तो नेमका कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता? तसेच त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी आणि 18 लाखांची कार आली कुठून? हा प्रश्न आहे.

आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे जमा करणारा विशाळ माझाच सहकारी...अखेर सुरेश धस यांची कबुली
Suresh Dhas
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 14, 2025 | 7:15 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला होता. हा आशिष विशाळ माझा सहकारी आहे, अशी कबुली आमदार सुरेश धस यांनी अखेर दिली आहे.

आधी म्हटले होते माझा संबंध नाही…

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची म्हणून आक्रोश मोर्चाच्या नावाखाली धाराशिवमधील आशिष विशाळ पैसे गोळा करत होता. तो माझाच सहकारी असल्याची कबुली आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या आशिष विशाळ याला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली होती. त्याने धाराशिव शहरात खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी आमदार सुरेश धस यांनी माझा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत “याला आणखी तुडवा,” असे भाष्य केले होते.

आता दिली कबुली

आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी मान्य केले आहे. तो नेमका कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता? तसेच त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी आणि 18 लाखांची कार आली कुठून? हा प्रश्न आहे. आशिष विसाळ हा आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचे सांगत सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत होता. त्यांच्याकडून खंडणी जमा करत होता. धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवून तो पैसे गोळा करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

आशिष विशाळ विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निवेदन दिले होते. मनसेने म्हटले होती की, आमदार सुरेश धस यांच्या बोगस लेटरहेडचा वापर करून आशिष मिसाळ याने अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्यांकडून खंडणी घेतली, त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.