Ashok Kharat case : अखेर अशोक खरात याची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला साप, वाघ हे सगळं…

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्व प्रकरणावर यावेळी तो पहिल्यांदाच बोलला आहे.

Ashok Kharat case : अखेर अशोक खरात याची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला साप, वाघ हे सगळं...
ashok kharat
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 7:36 PM

अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं अशोक खरात याच्या पोलीस कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आता 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयात सुनावणीवेळी सरकारी वकिलांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. अशोक थोरात याने 5 नरबळी दिल्याचा संशय आहे,  त्याच्या घरातून एक पिस्टल जप्त करण्यात आलं आहे, याच बंदुकीने त्याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे, असा आरोप यावेळी सरकारी वकिलांकडून अशोक खरात याच्यावर करण्यात आला आहे.  सरकारी वकिलांकडून त्याला सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, न्यायालयानं खरात याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान यावेळी काही बोलायचं आहे का? अशी विचारणा न्यायालयानं अशोक खरात याच्याकडे केली, यावेळी बोलताना अशोक खरात याने म्हटलं की,  जादूटोणा याबाबत मला काहीही माहिती नाही,  साप, वाघ, हरिण हे सगळं मी आत्ताच ऐकत आहे.  या अगोदर पोलिसांनी मला याबाबत कोणताही प्रश्न विचारलेला नाही.  मी या पूजा करत असताना ईशान्येश्वर मंदिरात एकाच वेळी २०० हून अधिक लोकं असायचे.  मंदिरात शुभ रात्र आणि श्रावणी सोमवार अशावेळी मी जात होतो. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत मला जे -जे प्रश्न विचारण्यात आले आहेत, त्या सर्व प्रश्नाची उत्तर मी दिली आहेत.   साप, वाघ याबद्दल मला काही माहिती नाही, असं खरात याने यावेळी न्यायालयाला सांगितलं.

दरम्यान या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे  अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी करण्यात येणार आहे. नाशिक पोलिसांकडून शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार आहे. या ट्रस्टवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या देखील सदस्य आहेत. त्यामुळे आता त्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या प्रकरणात अजूनही काही लोकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

Follow Us