
Ashok Kharat Nashik Crime News: गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून गैरवर्तन केल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्याच्या या व्हिडीओने खळबळजनक माजवली आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण संतप्त प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
58 व्हिडीओ जप्त
तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केले आहेत अशी माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर आणि त्याच्या परिसरातील अशोक खरातचे आलिशान फार्महाऊसही चर्चेत आले आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराच्या ट्रस्टशी खरातचा संबंध असून, मंदिराजवळच त्याचे फार्महाऊस असल्याची माहिती आहे. येथे अनेकदा राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि व्हीआयपी व्यक्तींची ये-जा असायची अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
कोट्यवधींच्या मालमत्तेचा तपास सुरु
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर स्वतःला ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि कलाकार त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने त्याची प्रतिमा पूर्णपणे ढासळली आहे.
यासोबतच पोलिसांनी त्याच्या विविध शहरांतील कोट्यवधींच्या मालमत्तेचाही तपास सुरू केला असून पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे.