मुंबई, पुणे, नाशिक सोडा अशोक खरातचं थेट तुर्कीशी कनेक्शन, राजवाड्यासारख्या फार्महाऊसवरील गुपित फुटलं

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने उद्योजकाला मरणाची भीती दाखवून ५ कोटींना लुटले असून, त्याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसमध्ये तुर्की येथून आणलेले फर्निचर आणि विदेशी साहित्याचा तपास आता सुरू झाला आहे.

मुंबई, पुणे, नाशिक सोडा अशोक खरातचं थेट तुर्कीशी कनेक्शन, राजवाड्यासारख्या फार्महाऊसवरील गुपित फुटलं
ashok kharat (
| Updated on: Mar 27, 2026 | 11:02 AM

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातचे एकामागून एक काळे कारनामे समोर येत आहेत. अध्यात्म आणि विधीच्या नावाखाली भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. अशोक खरातने उभे केलेले साम्राज्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशोक खरात विरुद्ध पुणे येथील उद्योजक राजेंद्र जासूद यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर, अशोक खरातचे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील आलिशान फार्म हाऊस आणि त्याची जगभ्रमंती आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे.

मरणाची भीती दाखवून उकळले ५ कोटी

पुण्यातील व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. विधी केला नाही तर कुटुंबात मृत्यू ओढवेल, अशी भीती खरातने जासूद यांना घातली होती. या मानसिक दबावाचा फायदा घेत त्याने जासूद यांच्याकडून तब्बल ४ ते ५ कोटी रुपये उकळले, असा आरोप राजेंद्र जासूद यांनी केला आहे. हे पैसे स्वतःच्या वैयक्तिक चैनीसाठी आणि मालमत्ता उभी करण्यासाठी वापरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अलिशान फार्म हाऊस उभारले

अशोक खरातने मिरगाव येथे एक अलिशान फार्म हाऊस उभारले आहे. हे फार्म हाऊस पाहून पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत. हे फार्म हाऊस सर्वसामान्य नसून एखाद्या राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फार्म हाऊसच्या अंतर्गत सजावटीसाठी लागणारे फर्निचर थेट तुर्कस्थान (Turkey) येथून मागवण्यात आले होते. या फर्निचरसह अन्य काही महागड्या वस्तूही परदेशातून आणल्याची माहिती समोर येत आहे.

आता तुर्कस्थानमधून आणलेल्या या फर्निचरमुळे खरातवर संकट ओढावलं आहे. अशोक खरातने तुर्कीतून मागवलेले फर्निचर तसेच इतर अन्य साहित्यावर नियमानुसार कस्टम ड्युटी (Custom Duty) भरली गेली आहे की नाही, याची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. जर यात करचोरी आढळली, तर खरातच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. जासूद यांनी दिलेल्या पैशांमधूनच हे साहित्य खरेदी केले गेले का, याचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत.

परदेशी सहलींचेही अनेक धागेदोरे समोर

केवळ मिरगावच नव्हे, तर अशोक खरातच्या परदेशी सहलींचेही अनेक धागेदोरे सापडत आहेत. भाविकांकडून उकळलेल्या पैशांवर त्याने अनेक परदेशी दौरे केल्याचा संशय आहे. या दौऱ्यांसाठी लागणारा खर्च आणि तिथे झालेले आर्थिक व्यवहार यांचीही व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भोंदूगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जासूद यांच्या फिर्यादीनंतर खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी खरातच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

Follow Us