मुंबईजवळच्या शहरातील 19 वर्षीय तरुणी ATS च्या रडारवर; तपासात हादरवणारी माहिती समोर

मुंबईजवळील शहरात 19 वर्षीय तरुणी ATS च्या रडारवर आली आहे. एटीएसच्या तपासात हादरवणारी माहिती समोर आली आहे.

मुंबईजवळच्या शहरातील 19 वर्षीय तरुणी ATS च्या रडारवर; तपासात हादरवणारी माहिती समोर
mumbra news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 2:54 PM

मुंबईजवळील मुंब्रामधील 19 वर्षीय तरुणी पासपोर्टमुळे एटीएसच्या रडारवर आली आहे. तिने जुन्या पोसपोर्टची माहिती न देता नव्याने पासपोर्ट तयार केलं. त्यानंतर एटीएसने केलेल्या तपासात तिचे वडील तारिक खानचे इंडियन मुजाहिद्दीन आणि एसआयएमआयशी कनेक्शन समोर आलं आहे. एटीएसच्या तपासानंतर एकच खळबळ उडाली आहे.

एटीएसच्या प्राथमिक तपासानंतर मुंब्रा पोलिसांनी नामीराह तारिक खानच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता एटीएसने नामीराहचा जुन्या पासपोर्ट आणि नव्या पासपोर्टमधील परदेश यात्रा आणि फरार बापाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, नामीराह खानने अर्धवट माहिती देऊन नवीन पासपोर्ट तयार केला. यानंतर एटीएसने तपास सुरु केला. नामीराहजवळ आधीच एक उत्तर प्रदेशातील लखनौमधील प्रशासनाने दिलेला पासपोर्ट होता. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नवीन पासपोर्ट बनवताना जुन्या पासपोर्टची माहिती द्यावी लागते. परंतु नामीराहने जुन्या पासपोर्टविषयी माहिती दिली नाही. तिने मुंब्राच्या पत्त्यावर नवीन पासपोर्ट बनवला. त्यानंतर एटीएसने जुना पासपोर्ट आणि परदेश दौऱ्यांचा तपास सुरू केला. तपासावेळी नामीराहच्या बापाचे मुजाहिद्दीन आणि SIMIशी कनेक्शन समोर आले आहे. एटीएसने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. तारिक खानच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. 2001 साली एक गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्याच्यावर बंदी घातलेल्या SIMI संघटनेशी कनेक्शन असल्याचा आरोप होता. पुढे 2006 साली मुंबई क्राइम ब्रँचने त्याच्या विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पुढे 2011 साली त्याच्या विरोधात बोगस नोटा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तारिक खानला इंडियन मुजाहिद्दीनच्या रियाज भटकल , यासीन भटकलचा जवळचा सहकारी मानलं जायचं. तारिक खानने त्याच्या संपर्कातील अनेक युवकांना पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबच्या ट्रेनिंग कँपमध्ये पाठवलं. सूत्रांच्या माहितीनुसार, तारिक खान हा 2006 साली भारत-नेपाळ सीमेवर इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित ट्रेनिंग सेंटरमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर अनेक युवकांना ट्रेनिंगला पाठवण्याचा आरोप आहे. पुढे 2007 साली तारिक खानने पुण्यातील कोंढवामध्ये इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित अनेक युवकांना लपवल्याचाही आरोप होता. त्यावेळी तारिक देखील तिथे होता. तो युवकांना मोबाईलवरुन ट्रेनिंग द्यायचा. आता नामीराहच्या नव्या पासपोर्ट प्रकरणात एटीएसने तपास सुरू केल्यानंतर तिची आई शबाना देखील फरार झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शबानाने पासपोर्टचं नुतनीकरण केलं होतं. आता एटीएस नामीराहचा आई शबाना आणि वडील तारिक खानच्या संभाव्य संपर्काचा तपास करत आहेत. नामीराहने जुन्या पासपोर्टची माहिती न देता नव्याने पासपोर्ट कशासाठी बनवला, याचा तपास एटीएस करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us