Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना अटक केल्यानंतर कुठे ठेवले? दीपकेंचा सनसनाटी गौप्यस्फोट; पोलिसांवर गंभीर आरोप
कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या अटकेनंतर आपल्याला व सहकाऱ्यांना बेकायदेशीरपणे २४ तास अज्ञात स्थळी ठेवले, संपर्क साधू दिला नाही, तसेच मानसिक छळ केला, असा गंभीर आरोप दीपके यांनी केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी 10 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना विमानात घुसून अटक केली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. त्या दिवशी दीपकेंचा कुणाशीच संपर्क होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. त्यामुळे दीपके नेमके कुठे आहेत? असा सवाल केला जात होता. त्यावर आज अखेर अभिजीत दीपके यांनी सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अभिजीत दीपके यांनी मीडियाशी संवाद साधताना धक्कादायक खुलासा करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मला अनधिकृतपण अटक करण्यात आली होती. ज्याची मलाच माहिती नव्हती अशी ठिकाणी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना 24 तास ठेवलं होतं. आमचा फोन काढून घेण्यात आला होता. आमचा कुणाशीही संपर्क होत नव्हता. आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत, याची माहितीही आम्हाला देण्यात आली नव्हती. मलाच नव्हे तर माझ्या वकिलांनाही आम्ही कुठे आहोत याची माहिती नव्हती, असा धक्कादायक आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे.
मी काय दहशतवादी आहे का?
सीजेपीचे नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांनी आज जंतरमंतरवर जाऊन तिरंगा फडकवला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावरही अभिजीत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशुतोष आणि इतरांनी जंतरमंतरवर तिरंगा फडकवला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. देशात गुंडागर्दी सुरू आहे. मलाही विमानातून अटक केली. विमानातून अटक करायला मी काय दहशतवादी आहे का? मी गुंड आहे का? असा सवाल करतानाच अमेरिकेच्या सांगण्यावरुन काही लोकांना सोडलं आणि आम्हाला अटक करतात, असा आरोप दीपके यांनी केला.
जंतरमंतर तुमच्या घरची प्रॉपर्टी आहे का?
सरकारविरोधात जो बोलतो त्याला अटक केली जाते. जंतरमंतर यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? आम्हाला जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा अधिकार आहे. माझी आजी वारलेली असताना दिल्ली पोलीस मला फोर्स करत होते. माझ्या आई वडिलांना फोन करायला सांगत होते. मध्यरात्री फोन करुन माझ्या घरच्यांना मानसिक त्रास द्यायचा होता. मी आता बऱ्याच दिवसासाठी तुरुंगात जाणार असल्याचं माझ्या घरच्यांना सांगत होते, असा आरोपही त्यांनी केला.