पदर खोचला, चपला भिरकावल्या… साडी सांभाळत जीवाच्या आकांताने धाव धाव धावली; आईने लेकीसाठी…

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रमाबाई रणवीर यांनी मुलीच्या शाळेच्या फीसाठी मॅरेथॉन जिंकली. साडी नेसून, पायात चप्पल नसतानाही, केवळ दृढ निश्चयाने त्यांनी ही शर्यत पूर्ण केली. त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीने त्यांना विजय मिळवून दिला आणि ₹3000 चे बक्षीस मिळाले, जे त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी वापरले.

पदर खोचला, चपला भिरकावल्या... साडी सांभाळत जीवाच्या आकांताने धाव धाव धावली; आईने लेकीसाठी...
Ramabai Ranvir
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 4:40 PM

मुलीची शाळेची फि भरायची आहे… एवढंच डोक्यात ठेवून ती जीवाच्या आकांताने धावली. पदर खोवला, साडी सांभाळली आणि जीवमुठीत घेऊन धावू लागली. धावता धावता तिच्या पायातील एक चप्पल निसटली. त्यामुळे तिने पायातील दुसरी चप्पलही भिरकावली अन् सैरावैरा धावतच सुटली. लक्ष्य एकच होतं, कसंही करून मुलीच्या शाळेची फि भरायचीय. अन् तिने कमाल करून दाखवली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील 47 वर्षीय रमाबाई रणवीरने शर्यत जिंकली. मॅरेथॉन जिंकली. दृढ निश्चयाचा विजय झाला. परिस्थितीने तिला जिंकण्यासाठी भाग पाडलं.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अमृत मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते भाग्यनगर चौकापर्यंत ही मॅरेथॉन होती. या मॅरेथॉनमध्ये तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. रमाबाई रणवीर यांनीही त्यात भाग घेतला. आपल्या मुलींचं भविष्य सुकर करण्यासाठी 47 वर्षीय रमाबाई यांनी यात भाग घेतला.

Loading...

अन् पहिली आली…

टॅकसूट नव्हता आणि स्पोर्ट्स शूजही तिच्याकडे नव्हते. इतर स्पर्धक तयारीत आले होते. पण रमाबाईकडे साहित्य नसले तरी इच्छाशक्ती होती. त्या बळावरच ती या मॅरेथॉनमध्ये पहिली आली. या विजयामुळे तिला 3 हजार रुपये मिळाले. या रकमेचा उपयोग त्या मुलीच्या फिसाठी करणार आहेत.

जिंकेल असं वाटलं नव्हतं…

जेव्हा रमाबाई स्पर्धेच्या ठिकाणी आल्या तेव्हा त्या साधी साडी नेसलेल्या होत्या. पायात चपला होत्या. त्यांना पाहिल्यावर त्या जिंकतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण त्यांच्या मनात मुलीच्या फिची चिंता होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छाशक्तीने माघार घेऊ दिली नाही. स्पर्धा सुरू होताच सुरुवातीपासूनच रमाबाईने जीव ओतून धावायला सुरुवात केली.

काही दूर अंतरावर धावत गेल्यावर त्यांच्या पायातील चप्पल सटकू लागली. त्यामुळे त्यांच्या धावण्याचा वेग कमी झाला. पण त्यांनी हार मानण्याऐवजी एक चप्पल भिरकावून दिली. दुसरी हातात घेतली. अन् अनवाणी पायानेच धावण्यास सुरुवात केली.

सकाळची थंडी, अनवाणी पायाला टोचणारे दगड गोटे तरीही त्या धावत होत्या. पदर खोचून आणि साडीला सांभाळत त्या धावत सुटल्या. आपल्याला स्पर्धेत पहिलं यायचंय आणि बक्षिस मिळवायचंय एवढंच त्यांचं लक्ष्य होतं. रमाबाई जिंकल्यानंतर त्यांची परिस्थिती कळताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सर्वच भावूक झाले. मैदानात आलेल्या सर्वांनी उभं राहून टाळ्यांचा गडगडाट करत रमाबाईचं अभिनंदन केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us