Aurangabad | औरंगाबादेत भाजप शहराध्यक्षांच्या स्पर्धेत आठ नेते, मंत्री अतुल सावेंच्या भूमिकेकडे लक्ष

| Updated on: Aug 18, 2022 | 10:16 AM

यंदा नव्याने होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये मंत्री अतुल सावे हे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लावतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Aurangabad | औरंगाबादेत भाजप शहराध्यक्षांच्या स्पर्धेत आठ नेते, मंत्री अतुल सावेंच्या भूमिकेकडे लक्ष
संजय केणेकर, अनिल मकरिये, राजू शिंदे
Image Credit source: social media
Follow us on

औरंगाबादः राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ (Maharashtra Politics) झाल्यानंतर आता प्रत्येक शहर  आणि जिल्ह्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच माजी मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी परभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता भाजपाच्या जिल्हा आमि शहर अध्यक्षपदाची पुन्हा एकदा निवड केली जाणार आहे. औरंगाबादमध्ये विद्यमान शहराध्यक्ष संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांच्यासह आठ जण सध्या स्पर्धेत आहेत. मात्र नुकतेच सहकारमंत्री पदी वर्णी लागलेले अतुल सावे यांचा निर्णय अखेरचा ठरणार आहे. त्यामुळे सावे यापैकी कोणत्या नेत्याची निवड करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

स्पर्धेतील नेते कोण कोण?

औरंगाबादमध्ये शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत विद्यमान अध्यक्ष संजय केणेकर यांच्यासोबतच अनिल मकरिये, समीर राजूरकर, राजू शिंदे, मकरिये, प्रमोद राठोड, कचरू घोडके, दिलीप थोरात, शिरीष बोराळकर यांचा समावेश आहे. शहराध्यक्षपदी वर्णी लागण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील चंद्रशेखर बावनकुळेंच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला जातोय..

अनिल मकरियेंना झुकते माप?

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. मराठवाड्यातील ओबीसी समाज भाजपसोबत घेण्यात बावनकुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बावनकुळे ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्या तेली समाजाची सध्या मराठवाड्यातील लोकसंख्या दहा लाखांच्या घरात आहेत. या समाजाच्या तैलिक महासंघ या मोठ्या संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे आहेत. भाजपचे अनिल मकरिये हे या संघटनेचे राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे औरंगाबाद भाजपच्या शहराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत अनिल मकरियेंना झुकते माप मिळेल, अशी चर्चा सुरु आहे. मात्र आगामी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांचे आव्हान पाहता शहराध्यक्ष पदाची निवड करणे हे आव्हानात्मक ठरणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर तसेच विदर्भातील असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा कार्यकर्ता वर्ग पसरलेला नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांकडूनच त्यांना नवी कार्यकारिणी निवडून घ्यावी लागणार आहे.

अतुल सावेंच्या भूमिकेकडे लक्ष

मागील वेळी औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा निकटवर्तीय समजले जाणारे विजय औताडे यांची निवड झाली होती. तर शहराध्यक्षपदावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे संजय केणेकर यांच्या नावासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र यंदा नव्याने होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये मंत्री अतुल सावे हे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लावतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.