औरंगाबाद नावासाठी हजारो नागरिकांचा कँडल मार्च, MIM खासदार इम्तियाज जलील म्हणाले….

| Updated on: Mar 10, 2023 | 9:41 AM

औरंगाबादमधील नामांतर विरोधी कृती समितीने मागील सात दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गुरुवारी भडकल गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चचं नेतृत्व महिलांनी केलं.

औरंगाबाद नावासाठी हजारो नागरिकांचा कँडल मार्च, MIM खासदार इम्तियाज जलील म्हणाले....
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शहरात भव्य कँडल मार्च काढण्यात आला. नामांतर विरोधी संघटनांनी गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हेसुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत. काल खा. जलील यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य कँडल मार्च काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गुरुवारी रात्री हा कँडल मार्च काढण्यात आला. शहराचे नाव औरंगाबाद हे कायम ठेवावे, अशी मागणी या नागरिकांनी केली. या कँडलमार्चमध्ये हजारो महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला.

नामांतरविरोधी समितचे बेमुदत आंदोलन

महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र सरकारनेही औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यास मंजूरी दिली आहे. याविरोधात औरंगाबादमधील नामांतर विरोधी कृती समितीने मागील सात दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गुरुवारी भडकल गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चचं नेतृत्व महिलांनी केलं.

खा. जलील यांचा इशारा काय?

औरंगाबाद हेच नाव राहून द्यावं, या मागणीसाठी हजारो नागरिक काल रस्त्यावर उतरलेले दिसले. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार इम्तियाज जलील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर कँडलमार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना खा. जलील यांनी संबोधित केलं. औरंगाबादचं नाव बदलण्याचा निर्णय याच शहरातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने घेतला पाहिजे. आमच्या शहराचं नाव बदलण्याचा निर्णय मुंबई आणि दिल्लीतून आलाय. हे आदेश आम्हाला मान्य नाहीत. आमच्या शहराचं नाव पुन्हा औरंगाबाद होईपर्यंत आमचा हा रस्त्यावरील आणि कायदेशीर लढा सुरु राहील, असा इशारा खा. जलील यांनी दिला.