Aurangabad | घाटी रुग्णालयावरचा ताण वाढला, प्रसूती कक्षही फुल्ल, नव्या जागेची गरज वाढली

| Updated on: May 11, 2022 | 1:16 PM

शासकीय रुग्णालयाला प्राधान्य देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयावरील ताणही वाढला आहे.

Aurangabad | घाटी रुग्णालयावरचा ताण वाढला, प्रसूती कक्षही फुल्ल, नव्या जागेची गरज वाढली
Follow us on

औरंगाबादः मराठवाड्यातील रुग्णांसाठी अत्यंत माफक दरात उपचार देणारे औरंबादचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणून घाटी (Aurangabad GHATI) हॉस्पिटलची ओळख आहे. मराठवाड्यासह  (Marathwada)अहमदनगर, जळगाव, धुळे आदी भागांतून येथे रुग्ण दाखल होतात. ग्रामीण भागातील (Rural Area) बहुतांश महिला येथे नॉर्मल डिलिव्हरी करिता घाटी रुग्णालयालाच प्राधान्य देतात. मात्र आता रुग्णालयातील प्रसूती कक्षातील मातांची संख्या प्रचंड वाढली असून हा विभाग ओसंडून वाहत आहेत. घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात 100 खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात दररोज 253 माता प्रसूती विभागाच्या वॉर्डात दाखल असतात. त्यामुळे जमिनीवर अंथरूण टाकून उपचार करण्याची वेळ आली आहे. तसेच इतर रुग्णांचीही संख्या गेल्या काही महिन्यात वाढली आहे. खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही, त्यामुळे घाटीला रुग्ण प्राधान्य देतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरील ताण वाढला आहे.

नवीन जागेची गरज

घाटीत नुकतीच अभ्यागत समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रसुती विभागाच्या अवस्थेवर चर्चा करण्यात आली. मराठवाड्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमधूनही माता येथे प्रसूतीसाठी येत असल्याने रुग्णसेवेचा ताण वाढत आहे. घाटीत माता आणि नवजात शिशुला एकाच छताखाली उपचार मिळावे, यासाठी 200 खाटांचे स्वतंत्र माता व बाल विभाग (MCH) उभारण्यात येणार होते. त्यासाठी जागाही निश्चित झाली होती. मात्र दूध डेअरी येथील जागेत महिला व नवजात शिशु रुग्णालयाची उभारणी सुरु आहे. त्यामुळे घाटीतील MCH विंग रद्द झाले. त्यामुळे प्रसुती विभागाची समस्या जैसे थेच आहे.

जिल्हा रुग्णालयावरही ताण वाढला

घाटी रुग्णालयावरचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णलयाचा पर्याय आहे. शासकीय रुग्णालयाला प्राधान्य देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयावरील ताणही वाढला आहे. सकाळपासून ओपीडी विभागात ज्या रांगा लागतात, ते रात्रीपर्यंत हीच स्थिती असते. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या 04 महिन्यात दुप्पट झाली आहे. प्रसूती, बालरोग, अस्थिव्यंगोपचार, सर्जरी, दंतोपचार अशा विविध विभागांची ओपीडी आणि आयपीडी सेवा येथे आहे. चार महिन्यांपूर्वी ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या 250-300 पर्यंत होती. आता ही संख्या पाचशेवर गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.