औरंगाबादेतील शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळाच्या दुरुस्तीसाठी कारागिर मिळाला, लवकरच टिक टिक वाजणार!

| Updated on: Mar 02, 2022 | 6:00 AM

शहागंज येथील टॉवरवरील घड्याळ दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तज्ज्ञांचा शोध सुरु होता. हे ऐतिहासिक घड्याळ, घंटा आणि सायरन हे तिन्ही वीजपुरवठा किंवा बॅटरी विनाच चालत होते. मात्र आता हैदराबाद येथील तज्ज्ञ वीज पुरवठ्याच्या सहाय्याने हे घड्याळ, सायरन दुरुस्त करून देणार आहेत.

औरंगाबादेतील शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळाच्या दुरुस्तीसाठी कारागिर मिळाला, लवकरच टिक टिक वाजणार!
Follow us on

औरंगाबादः ऐतिहासिक औरंगाबादमधील (Historic Aurangabad) शहागंज येथील ऐतिहासिक क्लॉक टॉवरचे (Shahaganj Tower) स्मार्ट सिटीच्या वतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र येथील घड्याळ आणि सायरन दुरुस्तीचे काम झालेच नव्हते. हे ऐतिहासिक घड्याळ दुरुस्तीसाठी तज्ज्ञ कारागिर मिळत नव्हता. त्यामुळे तब्बल 29 लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या टॉवरचे काम अर्धवटच राहिले होते. अखेर हैदराबादच्या (Hyderabad) एका कंपनीने वीजेवर चालणार घड्याळ आणि सायरन सुरु करण्यास होकार दर्शवला आहे. रमजान महिन्यात जुन्या औरंगाबादेत सहर आणि इफ्तारला या टॉवरवरून सायरन वाजवला जात होता. आता या घड्याळ आणि टॉवरची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रमजान महिन्यापूर्वी सायरन दुरुस्त केला जाईल, अशी अपेक्षा आहे.

टॉवर क्लॉकचे ऐतिहासिक महत्त्व

औरंगाबादच्या इतिहासात शेवटचे निझाम आसीफ जहाँ मेहबूब अलीखान यांनी निझाम राजवटीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहागंज मशिदीसमोर हा क्लॉक टॉवर उभारला होता. 3 मे 1901 मध्ये टॉवरच्या बांधकामाला सुरुवात झाली. 30 ऑक्टोबर 1906 रोजी हे काम संपले. मागील 10 ऑक्टोबर 2021 रोजी टॉवर उभारणीला 115 वर्षे पूर्ण झाली. या टॉवरचे वैशिष्ट्य म्हणजे घड्याळ दर तासाला घंटा वाजवायचे. मात्र 2003 मध्ये यातील सायरन आणि घड्याळ बंद पडले. टॉवरची पडझडही सुरु झाली. स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांच्या पुढाकारातून या टॉवरचे नूतनीकरण करण्यात आले. 100 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने टॉवरचे बांधकाम झाले होते, त्याच पद्धतीने आणि त्याच साहित्याद्वारे हे नूतनीकरण करण्यात आले.

साडे तीन लाख रुपयात घड्याळ दुरुस्त करणार

शहागंज येथील टॉवरवरील घड्याळ दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तज्ज्ञांचा शोध सुरु होता. हे ऐतिहासिक घड्याळ, घंटा आणि सायरन हे तिन्ही वीजपुरवठा किंवा बॅटरी विनाच चालत होते. मात्र आता हैदराबाद येथील तज्ज्ञ वीज पुरवठ्याच्या सहाय्याने हे घड्याळ, सायरन दुरुस्त करून देणार आहेत. यासाठी अंदाजे साडे तीन लाख रुपये खर्च येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं

Video : खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग! ‘जलमंदिर’ परिसरात मारला फेरफटका