Aurangabad MIM| भोंग्यांची भाषा करणाऱ्यांनी एखादी शाळापण खोलून दाखवावी, खा. इम्तियाज जलील यांचं तीन पक्षांना आव्हान!

| Updated on: May 12, 2022 | 4:43 PM

आज जिल्ह्यातील सर्व मोठ्या दर्ग्यांमध्ये आम्ही गेलो होतो. सोबतच औरंगजेब कबरीवर पण आम्ही गेलो. दर्ग्या शेजारीच कबर आहे त्यामुळे त्याला दुर्लक्ष करता येऊ शकत नाही आम्ही कबरीवर पण गेलो, त्यात काही गैर वाटत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.

Aurangabad MIM| भोंग्यांची भाषा करणाऱ्यांनी एखादी शाळापण खोलून दाखवावी, खा. इम्तियाज जलील यांचं तीन पक्षांना आव्हान!
Follow us on

औरंगाबादः भोंग्यांची भाषा करणाऱ्यांनी शहरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी एखादी शाळापण खोलून दाखवावी, असं आवाहन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलंय. गेले काही दिवसांपासून राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे, भाजपसोबत शिवसेनेच्या नेत्यांनाही खासदार जलील यांनी सुनावलं आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad school) तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने गरीबांच्या मुलांसाठी शाळा उघडण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्या हस्ते हा भूमीपूजन सोहळा संपन्न होत आहे. या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. अकबरुद्दीन ओवौसींच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील आपल्या भाषणातून मनसे, भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली.

काय म्हणाले खा. इम्तियाज जलील ?

गरीबांसाठीच्या शाळेच्या भूमीपूजन सोहळ्यात बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘ आज आम्ही औरंगाबाद शहरात एका शाळेचे उद्घाटन करत आहोत, शहरातील गरिबांना आम्ही शिक्षण उपलब्ध करणार आहोत, शिवसेनेने पण एखादी शाळा किंवा भाजपचे दोन मंत्री त्यांनी दोन शाळा किंवा भोंग्यांची भाषा करणाऱ्यांनी पण एखादी शाळा खोलून दाखवावी..’ असे आव्हान खासदार जलील यांनी दिलं आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे अनेकदा एमआयएमच्या नेत्यांवर टीका केली जाते. मात्र खासदार जलील म्हणाले की, आज जिल्ह्यातील सर्व मोठ्या दर्ग्यांमध्ये आम्ही गेलो होतो. सोबतच औरंगजेब कबरीवर पण आम्ही गेलो. दर्ग्या शेजारीच कबर आहे त्यामुळे त्याला दुर्लक्ष करता येऊ शकत नाही आम्ही कबरीवर पण गेलो, त्यात काही गैर वाटत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे आता खासदार जलील यांच्या या वक्तव्यावर इतर पक्षांच्या काय प्रतिक्रिया उमटतात ते पहावं लागेल.

अकबरुद्दीन ओवैसींच्या भाषणाकडे लक्ष

दरम्यान एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आज भाषणात काय बोलतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या विखारी भाषणासाठी प्रसिद्ध असलेले अकबरुद्दीन ओवैसी भोंग्यांबाबत काय वक्तव्य करतात, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.