
औरंगाबादः विकास आणि समाजातील वास्तविक समस्यांशिवाय इतर मुद्द्यांना हात घालणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाचं विश्वेषण करताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी फक्त दोन शेर ऐकवले. राज ठाकरे यांनी आज औरंगाबादचा, महाराष्ट्राचा इतिहास (Maharashtra History) उगाळून काढण्याची काहीच गरज नव्हती. इतिहासात जे चुकीचं घडलं आहे, ते आम्हालाही मान्य आहे. पण आता ते उकरून काढण्याची गरज नव्हती, असं सांगताना खासदार इम्तियाज जलील यांनी दोन शेर ऐकवले. राज ठाकरे यांचं भाषण नेमकं काय होतं, हे यातून स्पष्ट होतं असं खासदार जलील म्हणाले. तसेच राज ठाकरे यांनी कितीही चिथावणीखोर भाषा वापरली तरीही मुस्लिम समाज यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, विरोध करणार नाही, असंही खासदार जलील यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या भाषणाचं विश्लेषण करताना खासदार इम्तियाज जलील यांनी एक शेर ऐकवला..
सियासत नफरतों के जख्म को भरने ही नही देती..जब भी भरने आता है जख्म,वहा मख्खी बैठ जाती है!.. अशा प्रकारे राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण करणारे मुद्दे उभे केले आहेत, असं खासदार जलील म्हणाले. राज ठाकरे यांनी काढलेल्या खिल्जीचं आता काय कनेक्शन आहे, जे चुकीचं झालं ते झालं, त्याचं कुणी समर्थन करणार नाही. मुस्लीम समाजाला यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, शांत राहा, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल, तर तो मानावाच लागेल, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
सियासत की दुकानों में रोशनी के लिये जरूरी है मुल्क मेरा जलता रहे.. राज ठाकरे यांचा इशारा आणि एकूणच महाराष्ट्रात सुरु असलेल्या धार्मिक तेढ निर्माण कऱणाऱ्या स्थितीवर चपखल शब्दात भाष्य करणारा हा शेर खासदार जलील यांनी ऐकवला.
राज ठाकरे यांच्या भाषणावर मुस्लिम समाजाची काय प्रतिक्रिया उमटते यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र औरंगाबादच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अत्यंत संयमाने प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमबाबत निर्णय घेईल. राज ठाकरे यांनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलं नसून महाराष्ट्र सरकारला दिला आहे.विशेषतः गृहखातं ज्यांच्याकडे आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा इशारा दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने यावर प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज नाही. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाची अंमलबजाणी करावी. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या रिव्ह्यूमध्ये जाऊ शकता. पण एकदा सुप्रीम कोर्टानं जो काय निर्णय दिलाय, त्याचा परिणाम रस्त्यावर होऊ शकत नाही. आज युवकांना जे आदेश दिले जात आहेत. तुम्ही समाजात तेढ निर्माण करणार आहात. जे पोरं तिथे लाऊड स्पीकर लावणार आहेत. त्यांच्यावर केसेस आणि आपण एसी केबिनमध्ये बसणार. आम्ही अयोध्येला जाणार.. हे चुकीचं आहे.. असा इशारा खासदार जलील यांनी दिला.