Aurangabad | राज ठाकरेंची सभा ठरल्याप्रमाणेच !! 28 एप्रिलपासून पदाधिकारी औरंगाबादेत येणार, मनसे नेते नितीन सरदेसाईंची माहिती

| Updated on: Apr 26, 2022 | 5:38 PM

आम्ही सगळे पदाधिकारी 28 तारखेपर्यंत औरंगाबादमध्ये पोहचू. सभेच्या एक दिवसआधी राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होतील, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.

Aurangabad | राज ठाकरेंची सभा ठरल्याप्रमाणेच !! 28 एप्रिलपासून पदाधिकारी औरंगाबादेत येणार, मनसे नेते नितीन सरदेसाईंची माहिती
Image Credit source:
Follow us on

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची येत्या महाराष्ट्र दिनी होऊ घातलेली जाहीर सभा ठरल्याप्रमाणेच होणार आहे. यात कोणताही बदल होणार नाही, असं मनसे नेते (MNS Leader) नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी स्पष्ट केलं. मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. औरंगाबादमधील सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरीही काही दिवसात परवानगी मिळेल, राज ठाकरेंची सभा दणक्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शांतता राखण्यासाठी पोलिसांनी आदेश काढलेले असून त्यात मनसेला विरोध करण्याची भूमिका नसावी, असंही सरदेसाई यांनी म्हटलं.

‘राज ठाकरेंची सभा दणक्यात होणार’

औरंगाबाद येथील राज ठाकरे यांची सभा ठरल्याप्रमाणे होईल. आमचे सगळे पदाधिकारी 28 एप्रिलपासूनच औरंगाबादला जाणार आहेत. औरंगाबादमध्ये शांतता भंग करणं किंवा लॉ-ऑर्डर पालन न करणं, असं काही होणार नाही… आमची सभा अत्यंत शांततेत पार पडेल, असं वक्तव्य नितीन सरदेसाई यांनी केलं. औरंगाबादची सभा आणि आयोध्या दौरा यांच्या नियोजनासाठी आमचे सगळे पदाधिकारी कामाला लागलेत. आम्ही नकारात्मक विचार घेऊन पुढे जात नाही. सभेला परवानगी नक्कीच मिळेल, अशी आशा नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केली.

‘मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांची क्लीप पहावी’

नितीन सरदेसाई म्हणाले, ‘ काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात ते भोंग्यांच्या संदर्भात बोलत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील ती क्लिप पहावी म्हणजे बाळासाहेबांचे भोंग्यांच्या बद्दल काय मत आहे हे मुख्यमंत्र्यांना देखील कळेल. त्यांची भूमिका बदलली असेल तर त्यांचा पक्ष तोच आहे की नाही अशी शंका निर्माण होईल. आम्ही ज्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हणतोय ती बंद पाडण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न दिसतोय. हिंदुत्व असतं तर विरोध का केला असता? मुख्यमंत्र्यांनी आपल्या बोलण्याचा विचार केला पाहिजे. आपल्या बोलण्यात आणि कृतीत किती फरक आहे त्यांनी पहावं, असा सल्लाही नितीन सरदेसाई यांनी दिला.

‘ 28 एप्रिलपर्यंत सर्व पदाधिकारी औरंगाबादेत’

आम्ही सगळे पदाधिकारी 28 तारखेपर्यंत औरंगाबादमध्ये पोहचू. सभेच्या एक दिवसआधी राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होतील. राज ठाकरे आधी पुण्याला जातील आणि पुण्यावरून औरंगाबादला जातील, असं नियोजन असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

सुहास दाशरथेंचा मनसेला सोडचिठ्ठी

औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. यावर प्रतिक्रिया देताना नितीन सरदेसाई म्हणाले, ‘ एखाद दुसरी व्यक्ती पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असेल तरी काही फरक पडत नाही. पक्ष उभारी घेतोय सगळीकडे मनसेमय वातावरण तयार झालेला आहेत.. अयोध्या वारीमुळे देशभरात देखील चर्चा सुरू झालेली आहे.’