विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण! कल्याणमधला व्हिडीओ व्हायरल
कल्याणमधील दुर्गाडी परिसरात वाहतूक पोलीस विलास भागीत यांना विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याबद्दल जाब विचारल्याने चार तरुणांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, त्यांच्या मित्रांनी पोलिसांशी हुज्जत घातली. आरोपी शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याचे समजते. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
कल्याणमधील दुर्गाडी परिसरात वाहतूक पोलीस विलास भागीत यांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री दहाच्या सुमारास विलास भागीत हे दुर्गाडी चौकात वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारचालकाला त्यांनी थांबवून जाब विचारला. यावर कारचालकाने हुज्जत घातली आणि गाडीतील चार तरुणांनी वाहतूक पोलिसांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विलास भागीत यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांचा शर्टही फाटला. मारहाणीनंतर हे चौघे तरुण घटनास्थळावरून पसार झाले. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणांच्या काही मित्रांनी घटनास्थळी येऊन पोलिसांशी हुज्जत घातली, तसेच आरोपींना पळवून लावल्याचे आव्हानही दिले. मारहाण करणारे तरुण शिंदेंच्या शिवसेनेतील एका नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याची माहिती असून, आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

