Aurangabad | सिडको-हडकोचं पाणी कोण पळवतंय? भाजपाच्या आंदोलनानंतर मनपा सक्रीय, 9 कलमी कार्यक्रम

| Updated on: Apr 06, 2022 | 9:27 AM

शहरातील नागरिकांना सहा ते आठ दिवसांनी पाणी येते मग राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबादमध्येच का? असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला. पाणीपट्टी 610 रुपयेच असावी, यासाठी तुम्ही राज्य शासनाकडे आग्रह धरा, अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आली.

Aurangabad | सिडको-हडकोचं पाणी कोण पळवतंय? भाजपाच्या आंदोलनानंतर मनपा सक्रीय, 9 कलमी कार्यक्रम
पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक
Follow us on

औरंगाबाद | शहरातील जीर्ण झालेली जुनी पाणीपुरवठा योजना (Water Supply) आणि अत्यंत संथ गतीने सुरु असलेल्या नव्या पाणी योजनेमुळे औरंगाबादकरांची (Aurangabad) कोंडी होतेय. त्यातच शहराला जे पाणी येतंय, त्यातही चोरी होतेय, नागरिकांना ड्रेनेज मिश्रित घाणी पाणी येते, असे आरोप करत भाजपाने (BJP) आक्रमक भूमिका घेतली. मनपा प्रशासकांच्या बंगल्यासमोर आणि सिडकोतील एन- 5 जलकुंभासमोर भाजपने आक्रोश आंदोलन केले. त्यानंतर मनुपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी या विषयावर विस्तृत बैठक घेतली. तसेच पाण्याची गळती नेमकी कुठे होते, हे तपासण्यासाठी नऊ कलमी कार्यक्रम आखण्यात आला. शहरातील नागरिकांना सहा ते आठ दिवसांनी पाणी येते मग राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबादमध्येच का? असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला. पाणीपट्टी 610 रुपयेच असावी, यासाठी तुम्ही राज्य शासनाकडे आग्रह धरा, अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आली.

हक्काचे पाणी मुरते कुठे?

सोमवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, नक्षत्रवाडीपासून एन-5 च्या जलकुंभात दररोज 55 एमएलडी पाणी एक्सप्रेस जलवाहनीतून दिले जाते. प्रत्यक्षात 35 एमलडी पाणीच पोहोचते. शिवाजीनगर आणि पुंडलिक नगरसाठी प्रत्येकी 4 एमएलडी पाणी दिले जाते. म्हणजे 8 एमएलडी पाणी 55 एमएलडी पाण्यातून वजा केल्यास 10 एमएलडी पाण्याचा हिशोब लागत नाही. हे पाणी जाते कुठे, याची चौकशी करावी. एन- 5 जलकुंभावर कर्मचारी पैसे घेऊन जास्तीचे टँकर भरून देतात, ही बाब गंभीर आहे, असा आरोप अतुल सावे यांनी केला.

प्रशासकांचा नऊ कलमी कार्यक्रम

दरम्यान, शहरातील पाणी चोरी नेमकी कुठे होते, हे तपासण्यासाठी मनपा प्रशासकांनी नऊ कलमी कार्यक्रम आखला आहे. येत्या 15 दिवसात चोर शोधले जातील, असे आश्वासन प्रशासकांनी दिले असून पुढील नऊ उपायांद्वारे हे आश्वासन पूर्ण केले जाईल.
– जलकुंभावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
– टँकरवर जीपीएस
– मीटर दुरुस्ती
– नक्षत्रवाडी ते एन-५ जलवाहिनीवर दोन अधिकाऱ्यांची निगराणी ठेवणार
– गळती, चोरी शोधणार
– पाणी वितरणाची नोंदवही ठेवणार
– दोषी अधिकाऱ्यांची उचलबांगी अथवा कारवाई
– वेळापत्रकात सुधारणा
– ड्रेनेज दुरुस्ती

नव्या पाणीपुरवठा योजनेवर आज मंत्रालयात बैठक

महाराष्ट्र राज्य शासनाने औरंगाबादसाठी 1680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मागील दोन वर्षभरापासून योजनेचे कामही सुरु झाले आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यातच जुनी योजना जीर्ण झाल्यामुळे त्यातील जलवाहिन्या वारंवार फुटतात आणि नागरिकांना पाण्यासाठी तिष्ठत रहावे लागते. त्यामुळे नव्या योजनेला गती देण्यासाठी तसेच त्यातील विविध अडचणी सोडवण्यासाठी आज बुधवारी मंत्रालयात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. ही माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

इतर बातम्या-

Virat Kohli Runout IPL 2022: सॅमसनचा सुपरमॅन थ्रो, चहलची चालाकी आणि विराट RUNOUT पहा VIDEO

WHO Global Air Quality Index : जगातील 99 टक्के लोक घेतायत दूषित हवेत श्वास, भारताची स्थिती नेमकी कशी?