धरण फुटण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांनी घराबाहेर पडू नका, पुढील दोन दिवस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

| Updated on: Sep 28, 2021 | 11:43 AM

एखाद्या गावातील पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यावरून वाहन घेऊन अथवा पायीदेखील पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. असे करणे जीवावर बेतू शकते, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

धरण फुटण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांनी घराबाहेर पडू नका, पुढील दोन दिवस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
पिशोर येथे दोरखंडाच्या मदतीने रस्ता पार करताना नुकतीच एक दुर्घटना टळली.
Follow us on

औरंगाबाद: सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने औरंगाबादसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात हाहाकार माजवला (Heavy rain in Marathwada) आहे. परभणी, जालना, बीड, उस्मनाबाद, लातूरमध्येही पावसानं कहर केला आहे. अशा नैसर्गिक संकटात नागरिकांनीही खबरदारी बाळगत घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच गावातील कुणी बुडून वाहून गेले, पूल कोसळला, धरण फुटल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

औरंगाबादेत रेड अलर्ट, नदीकाठच्या गावांना इशारा

खुलताबाद अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व नागरिकांना पोलीसांच्या वतीने खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. आज आपल्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने, नदी काठच्या नागरिकांनी आपले जनावरे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी आणून ठेवावे व आपणही सुरक्षित ठिकाणी राहावे. कोणतीही जीवित व आर्थिक हानी होणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. हायवे वरील वाहतुकीसंदर्भात काही अडचण आल्यास तात्काळ मपो केंद्र खुलताबाद किंवा प्रशासनास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाचोऱ्यात धरण फुटल्याची अफवा

औरंगाबादेतील पाचोरा तालुक्यातील दिगी येथील धरण फुटल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु धरण सुरक्षित असून गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जो अफवा पसरवेल, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रत्येकाने खबरदारी घ्या. कारण गावातील शेतकरी, मजूर, नागरिक आणि प्रशासन पुरस्थितीवर मार्ग काढण्यात व्यग्र आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुलावरून पाणी वाहताना बस नेल्यास पोलिसांना फोन करा

तसेच एखाद्या गावातील पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यावरून वाहन घेऊन अथवा पायीदेखील पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. असे करणे जीवावर बेतू शकते, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच एखादा बसचालक पुलावरून पाणी वाहतानाही तेथून बस नेत असल्यास त्वरीत पोलिसांना कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दोरखंडाच्या मदतीने पाण्यातून चालू नका

अनेक गावात पाण्याच्या प्रवाहावरून जाण्यासाठी मोठे दोरखंड बांधले जातात. त्याच्या आधाराने नागरिक रस्ता पार करतात. मात्र अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून रस्ता पार करू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. रात्री झालेल्या मुसळधार पाऊसामुळे अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पिशोर येथील रामेश्वर वस्तीवर जाण्यासाठी जीवघेणा एक दोरखंड बांधण्यात आले आहे. त्या दोरखंडास पकडून शेतकऱ्यांना यावे लागत आहे.आज सकाळी दोरखंड पकडलेले असताना ही एक जण वाहून जात असताना थोडक्यात बचावला मोठी दुर्घटना टळली आहे. नागरिकांनी अशा धोकादायक प्रकार थांबण्याचे आव्हान जिल्हा व महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या- 

गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा

नाशिकमध्ये पहाटेपासून पावसाची झडझिंबड!