अभिजीत दीपकेंची गोकुळच्या वादात उडी, तो व्हिडीओ शेअर करत थेट निशाणा

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील वाद तीव्र झाला आहे. निवडणुकीत पराभव झाल्यावर सरकारने चार सदस्य नियुक्त केल्याने हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. अभिजीत दीपके यांनी या वादात उडी घेत मुख्यमंत्री फडणवीसांना 'अराजकतावादी' म्हटले. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील या विराट मोर्चातून जनमताचा अनादर केल्याचा आरोप करण्यात आला.

अभिजीत दीपकेंची गोकुळच्या वादात उडी, तो व्हिडीओ शेअर करत थेट निशाणा
abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 5:29 PM

गोकुळवर सरकारने चार सदस्य नेमल्याने त्याला विरोध करण्यासाठी आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतले. गायी, म्हशी सोबत घेऊन शेतकऱ्यांनी कोल्हापूरचा दसरा चौक गजबजून सोडला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात हा अतिविराट मोर्चा निघाला. या मोर्चात शेतकरी नेते राजू शेट्टी, शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार शाहू महाराज यांच्यासह असंख्य नेते उपस्थित होते. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा पायी मोर्चा निघाला होता. गोकुळच्या या वादात आता सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी उडी घेतली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील मोर्चाचा व्हिडीओ एक्सवर ट्विट करत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.

अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अराजकतावादी म्हटलं आहे. स्वत: एक दूध संघाची निवडणूक पराभूत झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याऐवजी आपल्या सत्तेचा वापर करत आहेत. जबरदस्तीने दूध संघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्ला अभिजीत दीपके यांनी केला आहे.

Loading...

 

काय म्हणाले दीपके?

दीपके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनमताचा कौल डावलून सत्ता हस्तगत करण्याचा डाव आहे. हेच लोक असली अराजकवादी आहेत. गोकुळ दूध संघाला या असंवैधानिक आणि अराजकतावादी शक्तींपासून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कोल्हापूरकरांना सलाम आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघात काय सुरू आहे, याबद्दल उत्सुकता असलेल्यांसाठी :

गोकुळ दूध संघाच्या निवडणुका झाल्या. सतेज पाटील गटाने 13 जागा जिंकल्या, तर भाजपप्रणित महायुतीचा 12 जागांसह पराभव झाला.

पराभवानंतर भाजप सरकारने अध्यादेश काढून मतदानाचा अधिकार असलेले 4 अतिरिक्त सदस्य नेमण्याची तरतूद केली.

या 4 अतिरिक्त मतांमुळे निवडणूक हरूनही भाजपप्रणित गटाला बहुमत मिळवून गोकुळवर ताबा मिळवता येऊ शकतो.

कल्पना करा, एका दूध सहकारी संस्थेचा जनादेश चोरण्यासाठी जर ते इतके हतबल असतील, तर ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने ते राज्यातील निवडणुकांमध्ये काय काय करत असतील? असा सवाल दीपके यांनी केला आहे.

गोकुळवरील चार सदस्य कोण?

दरम्यान, गोकुळवर चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी दिनकर अडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात ज्ञानदेव पाटील आणि प्रशांत पाटोळे यांना स्वीकृत सदस्य म्हणून गोकुळवर घेण्यात आलं आहे. या चौघांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. तर, पाटोळे हे सांगलीतील असल्याने सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.

कोर्टाचा निर्णय काय?

दरम्यान, गोकुळवर चार सदस्य नेमण्याच्या सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या नियुक्तीला स्थगिती देण्याची विनंती कोर्टाला करण्यात आली होती. पण कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली. उद्या 10 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच सरकार नियुक्त चार सदस्य मतदान करतील. पण त्यांचं मत मोजलं जाणार नाही, असा निर्णयच कोर्टाने दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us